वीज कनेक्शन मिळत नसल्याने शेतकऱ्याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून केला आत्मदहनाचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 18:45 IST2022-01-26T18:44:02+5:302022-01-26T18:45:24+5:30
Suicide Attempt Case : योगराज पाटील यांच्याकडे दहा बिगे शेती असून शेतीत मक्याचे पीक लावले आहे.

वीज कनेक्शन मिळत नसल्याने शेतकऱ्याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून केला आत्मदहनाचा प्रयत्न
जळगाव : दहा महिन्यापासून पाठपुरावा करुनही विजेचे कनेक्शन दिले जात नसल्याने योगराज प्रल्हाद पाटील (रा.सात्री ता. अमळनेर) शेतकऱ्याने प्रजासत्ताकदिनीच दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून स्वत: ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.
योगराज पाटील यांच्याकडे दहा बिगे शेती असून शेतीत मक्याचे पीक लावले आहे. शेतात वीज कनेक्शन मिळावे त्यासाठी त्यांचा दहा महिन्यांपासून महावितरण कंपनीकडे पाठपुरावा सुरु आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन दिले होते. महावितरणच्या कारभाराला कंटाळून योगराज पाटील या शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालय आवारात स्वतःवर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. जिल्हापेठ पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली.