मामुर्डीतील दुचाकीस्वाराचा अपघात नव्हे, घातपात करून केला खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 20:40 IST2019-12-07T20:37:29+5:302019-12-07T20:40:39+5:30
तळेगाव दाभाडे पोलीस : शवविच्छेदन अहवालामुळे गुन्हा उघडकीस

मामुर्डीतील दुचाकीस्वाराचा अपघात नव्हे, घातपात करून केला खून
पिंपरी : दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांकडे नोंद करण्यात आली होती. मात्र हा अपघाती मृत्यू नसून खून असल्याचे शवविच्छेदन अहवाल तसेच तपासाच्या इतर बाबींतून समोर आले आहे. मावळ तालुक्यातील मामुर्डी गावाच्या हद्दीत मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या सेवा रस्त्यालगत मृतदेह आढळला होता. याप्रकरणी खुनाचा गुन्हा तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दामोदर तुकाराम फाळके (वय ४७, रा. गहुंजे, ता. मावळ) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नीलेश बोकेफोडे यांनी फिर्याद दिली आहे.
द्रुतगती मार्गाच्या सेवा रस्त्याच्या लगत दामोदर फाळके यांचा २३ नोव्हेंबर २०१९ रोजी मृतदेह आढळून आला होता. दुचाकीवरून पडून गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाल्याबाबत मुलगा वेदांत दामोदर फाळके याने पोलिसांकडे खबर दिली होती. त्यानुसार तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली होती. मात्र शवविच्छेन अहवाल व इतर तपासाच्या बाबींतून हा मृत्यू अपघाती नसून घातपात असल्याचे समोर आले. शवविच्छेदनापूर्वी आठ ते १२ तास आधी दामोदर फाळके यांचा मृत्यू झाल्याचे अहवालातून निष्पन्न झाले आहे. तसेच फाळके यांनी मद्यप्राशन किंवा तत्सम अंमली पदार्थाचे सेवन केले नसल्याचा अभिप्राय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे फाळके यांचा अपघाती मृत्यू झाला नसून, दि. २२ नोव्हेंबर २०१९ रोजी द्रुतगती मार्गाच्या सेवा रस्त्याने दुचाकीवरून जात असताना अज्ञात व्यक्तिने अज्ञात कारणावरून टणक व बोथट हत्याराने फाळके यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी करून त्यांचा खून केला असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.