भिवंडीमध्ये भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी, अशी हत्या झालेल्या युवकांची नावे आहेत. भिवंडी तालुक्यातील खारबाव चिंचोटी रस्त्यावरील खार्डी येथे ही घटना घडली. प्रफुल्ल तांगडी भाजपा युवा मोर्चाचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होता.
प्रफुल्ल तांगडी दोन सहकाऱ्यांसह जेडीटी इंटरप्रायसेस, या आपल्या कार्यालयात बसलेला असतानाच सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास काही हल्लेखोरांनी कार्यालयात शिरून त्यांच्यावर हल्ला केला. प्राथमिक माहितीनुसार, चार ते पाच हल्लेखोरांनी हा हल्ला केल्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे, गेल्या एक वर्षा पूर्वीही भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडीवर हल्ला झाला होता.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या हत्याकांडानंतर, परिसरात तणावाचे वातावरण आहे. यामुळे, परिसरात पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.