धक्कादायक! गायी चोरल्याचा संशयावरून दोघांची हत्या; १३ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 15:14 IST2019-11-22T15:13:19+5:302019-11-22T15:14:49+5:30
पश्चिम बंगालमधील कूचबिहार जिल्ह्यात ही घटना घडली

धक्कादायक! गायी चोरल्याचा संशयावरून दोघांची हत्या; १३ जणांना अटक
पश्चिम बंगाल - दोन गायी चोरल्याच्या संशयावरून दोन जणांना जमावाने मरेपर्यंत बेदम मारहाण केली. पश्चिम बंगालमधील कूचबिहार जिल्ह्यात ही घटना घडली असून या प्रकरणी १३ जणांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती कुचबिहारचे पोलीस अधीक्षक संतोष निंबाळकर यांनी दिली. प्रकाश दास (३२) आणि बाबुल मित्र (३७) अशी मृत दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माथाभंगा येथील रहिवाशी असलेले प्रकाश दास आणि बाबुल मित्र यांना सुमारे ५.३० वाजताच्या सुमारास सुमारे २० स्थानिकांनी थांबवून त्यांच्या पिकअप व्हॅनमध्ये गायी पहिल्या. त्यानंतर स्थानिकांनी त्या दोघांना गाडीतून बाहेर काढले आणि लाठी व दगडांनी बेदम मारहाण केली. पोलीस घटनास्थळी पोहोचताच जमाव पांगला. जखमी दोघांना ताबडतोब कूचबिहार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्या दोघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, प्रत्यक्षात या गायी चोरीला गेल्या आहेत की नाही याची माहिती पोलीस घेत आहेत. पश्चिम बंगालमध्ये गायींची तस्करी केली जात असल्याची अफवा पसरली होती. गायीची तस्करी केली जात असल्याचा संशय जमावाला आल्याने त्यांनी या दोघांना बेदम मारहाण केली. आतापर्यंत पोलिसांनी १३ जणांना अटक केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक निंबाळकर यांनी दिली.