दोन लाचखोर नायब तहसीलदार अडकले एसीबीच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 21:24 IST2019-02-07T21:22:06+5:302019-02-07T21:24:46+5:30
तहसील कार्यालयात गुरूवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. राजश्री राजाराम मलेवार (४४) व तिलकचंद टिकाराम बिसेन (५५) असे लाचखोर नायब तहसीलदारांचे नाव आहे.

दोन लाचखोर नायब तहसीलदार अडकले एसीबीच्या जाळ्यात
गोंदिया - मलम्याची वाहतूक करणारा टिप्पर सोडला म्हणून याचा मोबदला म्हणून १५ हजारांची लाच घेणाऱ्या दोन नायब तहसीलदारांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. येथील तहसील कार्यालयात गुरूवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. राजश्री राजाराम मलेवार (४४) व तिलकचंद टिकाराम बिसेन (५५) असे लाचखोर नायब तहसीलदारांचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार तक्रारदार यांचा मलमा वाहतूक करणारा टिप्पर नायब तहसीदार मलेवार यांनी पकडून दंडात्मक कारवाई न करता सोडून दिला होता. त्याचा मोबदला म्हणून मलेवार यांनी २७ हजार ५०० रूपयांची मागणी केली. याबाबत नायब तहसीलदार बिसेन याने तक्रारदारांसोबत बोलणी करून मलेवार यांच्यासाठी रक्कमेची मागणी केली. तसेच तडजोडीअंती १५ हजार रूपयांवर बोलणी झाली. मात्र, तक्रारदाराची पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता पथकाने पडताळणी करून गुरूवारी तहसील कार्यालयात सापळा लावला. यात बिसेन याला मलेवार यांच्यासाठी १५ हजार रूपयांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. ही कारवाई गोंदिया लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली.