संतापजनक घटना! गतीमंद मुलीवर विकृत शेजाऱ्याचा पाशवी अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 19:11 IST2022-03-20T19:10:32+5:302022-03-20T19:11:33+5:30
Sexual Abuse Case : माहिती कळताच पोलिसांनी आरोपी सूरज लोखंडे (वय ४२) याच्या मुसक्या आवळून त्याला कोठडीत डांबले.

संतापजनक घटना! गतीमंद मुलीवर विकृत शेजाऱ्याचा पाशवी अत्याचार
नागपूर - गतीमंद मुलीला (वय ८ वर्षे) स्वताच्या घरात नेऊन एका नराधमाने तिच्यावर पाशवी अत्याचार केला. रविवारी दुपारी १ ते २ च्या सुमारास ही घटना घडली. दुपारी ४ वाजता या घटनेचा बोभाटा झाल्यानंतर इमामवाडा परिसरात संतापजनक वातावरण निर्माण झाले. दरम्यान, माहिती कळताच पोलिसांनी आरोपी सूरज लोखंडे (वय ४२) याच्या मुसक्या आवळून त्याला कोठडीत डांबले.
पीडित मुलगी रामबाग परिसरात राहते. ती गतीमंद असून घरची स्थिती अत्यंत गरिबीची आहे. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी तिचे आईवडील कामावर निघून गेले. दुपारी १ च्या सुमारास ती बाजुच्या एका १३ वर्षीय मुलीसोबत घराबाहेर खेळत असताना आरोपी सूरज लोखंडेची विखारी नजर तिच्यावर गेली. त्याने १३ वर्षीय मुलीला हुसकावून लावले अन् पीडित मुलीला आपल्या घरात नेले. तेथे त्याने तिच्यावर पाशवी अत्याचार केला. २ वाजताच्या सुमारास आधीची मुलगी परत आली तेव्हा पीडित मुलीला नराधम आरोपीने सोडून दिले.
दरम्यान, तिची आई दुपारी ४ च्या सुमारास घरी आली तेव्हा तिला मुलीला रक्तस्त्राव होत असल्याचे लक्षात आले. आईने मुलीला विचारणा केली असता तिने सांकेतिक हातवारे करून नराधम लोखंडेचे कुकर्म उघड केले. आईने शेजाऱ्यांना या घटनेची माहिती देऊन इमामवाडा पोलीस ठाणे गाठले. महिलेची कैफियत ऐकून पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन नराधम लोखंडेला जेरबंद केले. तोपर्यंत रामबाग परिसरात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.