चोरट्यांनी डुप्लिकेट चावीने चोरलेल्या ५१ मोटारसायकली हस्तगत
By शेखर पानसरे | Updated: March 29, 2023 17:55 IST2023-03-29T17:55:13+5:302023-03-29T17:55:43+5:30
जिल्हा पोलिस अधीक्षकांची माहिती ; संगमनेर पोलिसांची कारवाई

चोरट्यांनी डुप्लिकेट चावीने चोरलेल्या ५१ मोटारसायकली हस्तगत
शेखर पानसरे
संगमनेर : चोरट्यांनी डुप्लिकेट चावीने चोरलेल्या ५१ मोटारसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. मंगल कार्यालये, लॉन्स अशा गर्दीच्या ठिकाणाहून हे चोरटे मोटारसायकलींची चोरी करायचे. अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतून चोरी केलेल्या मोटारसायकली पोलिस पथकाने सेंधवा (मध्यप्रदेश), नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे, वाशिम या जिल्ह्यांतून हस्तगत केल्याचे अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षक ओला हे बुधवारी (दि.२९) संगमनेरात आले होते. संगमनेर उपविभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्यांतील पोलीस निरिक्षकांची त्यांनी बैठक घेत कायदा सुव्यवस्था याबाबत माहिती घेतली. त्यानंतर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पत्रकारांशी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अक्षय सावन तामचिकर (वय १८), सुरजित दिलिपसिंग तामचिकर (वय २२) (दोघेही. रा. घुलेवाडी, संगमनेर) पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. मोटारसायकली चोरींच्या गुन्ह्यात समावेश असलेल्या एका विधिसंघर्षग्रस्त बालकास त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. संगमनेर उपविभागाचे प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील विशेष पोलिस पथकातील पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, अमृत आढाव आदींनी सखोल तपास करत चोरीला गेलेल्या ५१ मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.