डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 11:46 IST2025-09-25T11:41:21+5:302025-09-25T11:46:25+5:30
आई इतकी क्रूर कशी होऊ शकते, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

AI Generated Image
आंध्र प्रदेशातील नांदयाल जिल्ह्यातून माणुसकीला आणि नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका निर्दयी मातेने फक्त १ एकर जमिनीच्या वादातून आपल्याच सख्ख्या मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली असून, एका जमिनीच्या तुकड्यासाठी आई इतकी क्रूर कशी होऊ शकते, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
नेमकं काय घडलं?
ही घटना नांदयाल जिल्ह्यातील मोटुकुरु गावातील आहे. गावातील वेंकट शिवम्मा नावाच्या महिलेकडे १३ एकर शेतजमीन आहे. तिने यापैकी ५-५ एकर जमीन आपले दोन मुलगे सुधाकर आणि शिवाजी यांच्या नावावर केली होती, तर ३ एकर जमीन स्वतःकडे ठेवली होती. सुधाकरला मिळालेल्या ५ एकर जमिनीपैकी १ एकर जमीन त्याची आई वेंकट शिवम्माने त्याचा लहान भाऊ शिवाजीच्या नावावर केली होती, ज्यामुळे सुधाकरला ती जमीन विकता येणे शक्य नव्हते.
सुधाकरवर मोठे कर्ज होते आणि ते फेडण्यासाठी त्याला आपली जमीन विकायची होती. यासाठी तो वारंवार आपला लहान भाऊ शिवाजीकडे त्या १ एकर जमिनीसाठी सही मागित होता. मात्र, शिवाजीने सही करण्यास नकार दिला, ज्यामुळे दोघांमध्ये जमिनीवरून वाद सुरू झाला.
आईनेच केला मुलाचा खून
पितृ पक्षाच्या अमावास्येला वेंकट शिवम्मा आपल्या लहान मुलाच्या, शिवाजीच्या घरी आली होती. त्याचवेळी, सुधाकरही तिथे पोहोचला. पुन्हा त्यांच्यामध्ये जमिनीवरून वाद सुरू झाला. हा वाद विकोपाला गेला आणि थोड्याच वेळात सुधाकरचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. या घटनेनंतर सुधाकरची पत्नी ज्योती हिने थेट पोलिसांत धाव घेतली आणि आपल्या सासूवर, म्हणजेच सुधाकरच्या आईवरच हत्येचा आरोप केला.
ज्योती हिने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, तिची सासू वेंकट शिवम्मा हिनेच सुधाकरची हत्या केली आहे. तिने आधी सुधाकरच्या डोळ्यात मिरची पूड टाकली आणि नंतर साडीने गळा आवळून त्याचा खून केला. ज्योतीचा असा आरोप आहे की, या हत्येमध्ये तिची सासू, दीर शिवाजी आणि नणंद यांचा सहभाग आहे. या सर्वांनी मिळून सुधाकरचा खून केल्याचे ज्योतीने म्हटले आहे.
पोलीस तपास सुरू
ज्योती हिने सांगितले की, यापूर्वीही तिने जमिनीच्या वादाबद्दल पोलिसांत अनेक वेळा तक्रार केली होती. पोलिसांनी तिच्या सासूला आणि नणंदेला पोलीस ठाण्यात बोलावले होते, पण त्या आल्या नाहीत. आता ज्योतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सुधाकरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेने गावात प्रचंड तणाव असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.