सांगलीत एकमेकांकडे रागाने बघण्यावरून तरुणाचा खून, तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 00:29 IST2023-04-14T00:28:49+5:302023-04-14T00:29:58+5:30
गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास साखर कारखान्याच्या प्रवेशव्दारातच हा प्रकार घडला. संजयनगर पोलिसांनी तातडीने तिघांना ताब्यात घेतले आहे.

सांगलीत एकमेकांकडे रागाने बघण्यावरून तरुणाचा खून, तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात
सांगली: एकमेकांकडे रागाने बघण्यावरून शहरातील साखर कारखाना परिसरात महाविद्यालयीन तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. राजवर्धन रामा पाटील (वय १८, रा. मतकुणकी, ता. तासगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो येथील आयटीआयमध्ये शिकत होता. गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास साखर कारखान्याच्या प्रवेशव्दारातच हा प्रकार घडला. संजयनगर पोलिसांनी तातडीने तिघांना ताब्यात घेतले आहे.
मूळचा मतकुणकी येथील राजवर्धन औद्योगिक वसाहतीमधील आयटीआयमध्ये प्रथम वर्षात होता. शिक्षणानिमित्त तो बुधगाव येथील नातेवाईकांकडे राहण्यास होता. दररोज सायंकाळी कारखान्याच्या थांब्यावरून तो बसने घरी जात असे. संशयित हल्लेखोर आणि त्याच्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून एकमेकांकडे रागाने बघण्यावरून वाद झाला होता.
गुरूवारी राजवर्धन महाविद्यालयात आला होता व सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तो कारखाना परिसरातून जात होता. यावेळी त्याचा एक मित्रही सोबत होता. यावेळी संशयित आणि राजवर्धन यांच्यात पुन्हा एकदा एकमेकांकडे बघण्याचा प्रकार घडला. यातूनच हल्लेखोरांनी त्याला कारखाना प्रवेशद्वाराजवळ बोलावून घेत त्याच्या मानेवर आणि छातीवर दोन वार केले. यात तो खाली कोसळला. त्यानंतर संशयितांनी तिथून पळ काढला.
सायंकाळच्या सुमारास रस्त्यावर गर्दी असताना हा प्रकार घडल्याने घटनास्थळावर गर्दी झाली होती. यानंतर त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करत त्याला मृत घोषित केले. खुनाची माहिती मिळताच संजयनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक संजय क्षीरसागर यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी तातडीने तपास करत तिघांना ताब्यात घेतले. संशयित आयटीआय परिसरात नेहमी असत. रागाने बघण्यावरून हा प्रकार घडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
चार दिवसात दुसरा खून
जानेवारीपासून शहरात एकाही खुनाची नोंद झाली नव्हती. मात्र, रविवारी वानलेसवाडी येथे जागेच्या वादातून महिलेचा खून करण्यात आला होता. त्यानंतर अवघ्या चारच दिवसात शहरात दुसरा खून झाल्याने खळबळ उडाली आहे.