प्रियकराने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटविले; ६१टक्के भाजल्याने रुग्णालयात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 18:57 IST2022-07-04T18:57:18+5:302022-07-04T18:57:56+5:30
Self Immolation Case : पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सोळा वर्षीय मुलाचे अल्पवयीन मुलीवर प्रेम जडले; मात्र काही कारणावरून प्रेयसीसोबत त्याचे वाद झाले आणि या वादातूनच मुलाने मागचापुढचा काहीही विचार न करता संतापाच्या भरात स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले.

प्रियकराने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटविले; ६१टक्के भाजल्याने रुग्णालयात मृत्यू
नाशिक : प्रेमाला काही नातं नसतं प्रेम कधीही आणि कुणावरही जडते. प्रेमाला वयाचेही भान नसते. प्रेमातून रेशीम गाठी बांधण्याच्या आणाभाका घेतल्या जातात त्यात काही यशस्वी होतात तर काही अपयशी ठरतात; मात्र प्रेमभंगातून आलेल्या नैराश्यापोटी काहीतरी टोकाचा निर्णय घेत आयुष्य संपविणे हे योग्य नाहीच; मात्र दुर्दैवाने अशीच घटना पंचवटीतील हिरावाडी भागात घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. सोळाव्या वर्षी अल्पवयीन मुलाने अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेतल्याने त्याचा रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सोळा वर्षीय मुलाचे अल्पवयीन मुलीवर प्रेम जडले; मात्र काही कारणावरून प्रेयसीसोबत त्याचे वाद झाले आणि या वादातूनच मुलाने मागचापुढचा काहीही विचार न करता संतापाच्या भरात स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. ही घटना शुक्रवारी (दि.२४) रात्री नऊ वाजेच्या सुमारास हिरावाडीमधील एका मंदिरामागेे घडली. येथील पुलावर अजय मोहन धोत्रे याने बाटलीत पेट्रोल आणून स्वत:च्या अंगावर टाकून पेटवून घेतले. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी नागरिकांच्या मदतीने दाखल केले. तो ६१टक्के भाजला होता.
आठवडाभर त्याची मृत्युशी झुंज सुरु होती; मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान रविवारी (दि.३) त्याचा मृत्यु झाला. हिरावाडी परिसरात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील दोघे भाऊ असा परिवार आहे.