क्रूरतेचा कळस! जेवण वाढायला उशीर झाला म्हणून पतीने पत्नीला संपवलं; मृतदेहापाशीच बसून राहिला अन्..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 09:29 IST2026-01-09T09:28:10+5:302026-01-09T09:29:32+5:30

शेतावरून काम करून आल्यानंतर जेवण मिळायला थोडा उशीर झाला, या कारणावरून संतापलेल्या एका नराधम पतीने आपल्या पत्नीला संपवले!

The height of cruelty! Husband kills wife because food was delayed; stays by her body and... | क्रूरतेचा कळस! जेवण वाढायला उशीर झाला म्हणून पतीने पत्नीला संपवलं; मृतदेहापाशीच बसून राहिला अन्..

AI Generated Image

भूक माणसाचा विवेक हरपून टाकते, याचा प्रत्यय देणारी एक थरारक घटना उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातून समोर आली आहे. शेतावरून काम करून आल्यानंतर जेवण मिळायला थोडा उशीर झाला, या कारणावरून संतापलेल्या एका नराधम पतीने आपल्या पत्नीच्या डोक्यात फावड्याने सपासप वार करून तिची निर्घृण हत्या केली. या घटनेने संपूर्ण देवापूर गाव हादरून गेले असून कौटुंबिक वादाचा असा रक्तरंजित अंत पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत.

नेमकं काय घडलं?

मुरादाबादच्या कटघर कोतवाली क्षेत्रातील देवापूर गावात राजू सैनी नावाचा तरुण आपल्या कुटुंबासह राहतो. गुरुवारी संध्याकाळी राजू शेतातील काम आटोपून घरी परतला. कष्टाचे काम करून आल्यामुळे तो खूप भुकेलेला होता. घरी येताच त्याने पत्नी पूनम हिच्याकडे जेवणाची मागणी केली. पूनम घराच्या कामात व्यस्त असल्यामुळे जेवण तयार व्हायला थोडा उशीर झाला होता. याच शुल्लक कारणावरून दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली.

रागाच्या भरात विवेक हरपला

भांडण इतके विकोपाला गेले की, संतापलेल्या राजूने समोर पडलेले फावडे उचलले आणि पूनमवर हल्ला चढवला. त्याने पूनमच्या डोक्यावर एक-दोनदा नव्हे, तर तब्बल तीन वेळा फावड्याने जोरदार वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, पूनम रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

हत्येनंतर मृतदेहाशेजारीच बसून राहिला!

या घटनेनंतर आरोपी राजू तिथून पळून गेला नाही. गुरांच्या गोठ्यात आपल्या पत्नीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असताना, तो शांतपणे तिथेच बसून राहिला. घरातील विखुरलेले अन्न आणि रक्ताचे डाग तिथल्या क्रूरतेची साक्ष देत होते. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तिथे धाव घेतली आणि पोलिसांना कळवले.

मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

माहिती मिळताच कटघर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोलिसांनी आरोपी राजू सैनीला तात्काळ ताब्यात घेतले आहे. मृताच्या मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आपल्या वडिलांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून या दाम्पत्यामध्ये किरकोळ कारणावरून खटके उडत होते, अशी माहितीही समोर आली आहे.

पोलिसांची प्रतिक्रिया

"संध्याकाळी पाचच्या सुमारास कौटुंबिक वादातून हत्येची माहिती मिळाली होती. घटनास्थळी पोहोचल्यावर आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुराव्यांची जुळवाजुळव सुरू असून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे," असे पोलीस अधीक्षक कुमार रणविजय सिंह यांनी सांगितले.

Web Title: The height of cruelty! Husband kills wife because food was delayed; stays by her body and...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.