ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 21:55 IST2025-10-01T21:53:21+5:302025-10-01T21:55:51+5:30
अतिक्रमण हटवण्यासाठी उपायुक्त शंकर पाटोळे यांनी केली होती ५० लाखांची मागणी

ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
रणजीत इंगळे, जितेंद्र कालेकर - ठाणे : नौपाडा भागातील घंटाळी परिसरातील अतिक्रमणावर कारवाई करून मुंबईतील बिल्डरला सहकार्य करण्याकरिता ५० लाखांची मागणी करून त्यातील २५ लाखांच्या लाचेची रक्कम स्वीकारताना ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) मुंबई पथकाने बुधवारी सायंकाळी रंगेहाथ अटक केली. ज्यांच्यावर कारवाईची जबाबदारी आहे, तोच अधिकारी लाच घेताना पकडला गेल्याने महापालिकेतील भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पडले. रात्री उशिरापर्यंत नाैपाडा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेती.
एसीबीच्या सूत्रांनुसार, मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाची घंटाळी परिसरात जागा आहे. या जागेवर अतिक्रमण झाले होते. हे अतिक्रमण हटविण्यासाठी पाटोळे यांनी ५० लाखांच्या लाचेची मागणी केली हाेती. यातील दहा लाख रुपये संबंधित बांधकाम व्यावसायिकाने त्यांच्याकडे काही दिवसांपूर्वी सुपूर्द केले हाेते. त्यानंतर उर्वरित ४० लाख रुपये देण्याआधी या बांधकाम व्यावसायिकाने थेट मुंबईच्या एसीबीकडे तक्रार केली. मुंबई एसीबीच्या विशेष पथकाने बुधवारी सापळा रचून पाटोळे यांना उर्वरित ४० पैकी २५ लाखांची लाच स्वीकारताना अटक केली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयातील कागदपत्रांची उशिरापर्यंत छाननी केली. त्याचवेळी त्यांच्या घरी सर्च ऑपरेशन राबविण्यात आले.
गेल्या काही महिन्यांपासून ठाणे महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांवर मोठ्या प्रमाणात कारवाया सुरू आहेत. न्यायालयाने अनधिकृत बांधकामांवरून आयुक्त राव यांना अक्षरश: धारेवर धरल्यावर ही कारवाई सुरू झाली. मात्र, ठाण्यातील अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणारे हेच अधिकारी असल्याचे आता उघड झाले आहे. कारवाई करण्याकरिता व न करण्याकरिताही लाचेची मागणी होत असल्याचेच संकेत या कारवाईमुळे प्राप्त झाले. योगायोगाने ठाणे महापालिकेचा बुधवारी ४३ वा वर्धापनदिन होता. याच दिवशी ही कारवाई झाल्याने महापालिकेच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसल्याचे बाेलले जात आहे.
वादग्रस्त ऑडिओ क्लिपमध्ये शिंदे गटाच्या नगरसेवकांची नावे
दोन दिवसापूर्वीच अतिक्रमण विभागातील एका माजी अधिकाऱ्यांची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती. यामध्ये या माजी अधिकाऱ्याने शंकर पाटोळे यांच्यासकट सेवेत असलेल्या अधिकारी आणि शिंदे गटातील माजी नगरसेवकांची नावे देखील घेतली होती. त्यामुळे यामध्ये ठाणे पालिकेचे इतर अधिकारी देखील चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची चिन्हे आहेत. तसेच शिंदे गटातील माजी नगरसेवक ही बेकायदा बांधकामे प्रकरणात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उपमुख्यमत्र्यांच्या जवळचा अधिकारी
गेल्या ३ वर्षात ठाण्यात बेकायदा बांधकामे वाढली असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पालिकेनचे अधिकारी मुजोर झाले आहेत असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यामुळे ठाणें पालिकेत नेमके चालले तरी काय? असा सवाल उपस्थित झाला आहे. दरम्यान, एसीबीच्या जाळ्यात सापडलेले पाटोळे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे अधिकारी म्हणून संपूर्ण महापालिकेत चर्चेत आहे.
राजकीय हितसंबंध असल्याचेही आरोप
राजकीय हितसंबंध असल्यामुळे ठाणे एसीबी कारवाई करू शकत नाही. त्यामुळे मुंबई एसीबीकडे तक्रार करण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, मुंबई एसीबीने आज संध्याकाळी सापळा रचत पाटोळे यांना रंगेहाथ पकडले आहे.