तंबाखूच्या पाकिटाचे 15 रुपये मागितले, प्रकरण चिघळले; चहावाल्याला गोळ्या घालून तरुण पळाले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 12:45 PM2023-10-21T12:45:20+5:302023-10-21T12:57:05+5:30

दोन तरुणांनी चहावाल्याकडून तंबाखूचं पाकिट घेतलं. चहावाल्याने 15 रुपये मागितल्यावर तरुणांनी त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली

Tea stall owner shot dead after row over Rs 15 in Meerut | तंबाखूच्या पाकिटाचे 15 रुपये मागितले, प्रकरण चिघळले; चहावाल्याला गोळ्या घालून तरुण पळाले

तंबाखूच्या पाकिटाचे 15 रुपये मागितले, प्रकरण चिघळले; चहावाल्याला गोळ्या घालून तरुण पळाले

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जागृती विहार एक्स्टेंशनमध्ये शुक्रवारी बुलेटवरून आलेल्या दोन तरुणांनी एका चहावाल्याची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर दोन्ही तरुणांनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन तरुणांनी चहावाल्याकडून तंबाखूचं पाकिट घेतलं. चहावाल्याने 15 रुपये मागितल्यावर तरुणांनी त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. या वादाचं पुढे हाणामारीत रुपांतर झालं आणि नंतर आरोपीने चहा विक्रेत्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये चहावाल्याचा मृत्यू झाला आहे. 

ओंकार सिंह असं चहावाल्याचं नाव असून तो मूळचा गावंडा गावचा रहिवासी आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलेटवरून दोन तरुण ओंकारच्या चहा टपरीवर पोहोचले. तरुणांनी तेथून तंबाखू विकत घेतल्याचं सांगण्यात आलं. दुकानदाराने 15 रुपये मागितले असता तरुणाचा ओंकारसोबत वाद झाला. यानंतर एका तरुणाने चहा विक्रेत्यावर गोळीबार केला.

छातीत गोळी लागल्याने ओंकार जखमी होऊन रस्त्यावर पडला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. लोकांनी पोलिसांना माहिती दिली आणि जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. तेथे डॉक्टरांनी ओंकारला मृत घोषित केलं. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याचं वैद्यकीय निरीक्षकांनी सांगितलं. मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे.
 

Web Title: Tea stall owner shot dead after row over Rs 15 in Meerut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.