अनैतिक संबंधातून पतीचे तुकडे करुन नदीत फेकून दिले; फोटो डिलिट करायला विसरली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 15:10 IST2025-12-25T15:04:37+5:302025-12-25T15:10:01+5:30
संभलमध्ये प्रियकराच्या मदतीने पतीचे कटरने तुकडे करणाऱ्या पत्नीला महिन्याभरानंतर अटक करण्यात आली आहे.

अनैतिक संबंधातून पतीचे तुकडे करुन नदीत फेकून दिले; फोटो डिलिट करायला विसरली अन्...
Rahul Murder Case: पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यातील चंदौसी परिसरात उघडकीस आली आहे. रूबी नावाच्या महिलेने आपल्या प्रियकरासह मिळून पती राहुलची हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. मात्र, राहुलच्या हातावरील टॅटू आणि एका फोटोने ही भयानक घटना समोर आली.
राहुल हा व्यापारी असून तो आपली पत्नी रूबी आणि दोन मुलांसह चंदौसी येथील चुंगी येथे राहत होता. मात्र, रूबीचे तिच्याच परिसरातील गौरव नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. १७ नोव्हेंबरच्या मध्यरात्री राहुल घरात नसताना रूबीने गौरवने घरी बोलावले होते. रात्री २ च्या सुमारास राहुल अचानक घरी पोहोचला आणि त्याने पत्नीला गौरवसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. यावरून घरात मोठा वाद झाला. राहुलने पत्नीला मारहाण केली आणि तिची समाजात बदनामी करण्याची धमकी दिली. यामुळे संतापलेल्या रूबीने जवळच पडलेला लोखंडाचा रॉड राहुलच्या डोक्यात मारला, ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.
कटरने तुकडे अन् ५० किमीचा प्रवास
हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. गौरवने बाजारातून एक कटर मशीन आणले. दोघांनी मिळून राहुलचे शीर, हात आणि पाय कापून शरीराचे तुकडे केले. रूबीने बाजारातून दोन मोठे काळ्या बॅग आणल्या. एका बॅगेत शीर आणि हात-पाय भरून ते ५० किलोमीटर दूर राजघाट गंगा नदीत फेकून दिले. शरीराचा उर्वरित भाग दुसऱ्या बॅगेत भरून एका शेतात फेकून दिला.
स्वतःला वाचवण्यासाठी रूबीने २४ नोव्हेंबर रोजी स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन पती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. मात्र १५ डिसेंबर रोजी पोलिसांना एक सडलेला मृतदेह मिळाला, ज्याला शीर आणि पाय नव्हते. ओळख पटवणे कठीण असतानाच पोलिसांना धडाच्या हातावर राहुल नावाचा टॅटू दिसला. पोलिसांनी जेव्हा रूबीला ओळख पटवण्यासाठी बोलावले, तेव्हा तिने मृतदेह ओळखण्यास नकार दिला.
मात्र, पोलिसांनी जेव्हा रूबीचा मोबाईल तपासला, तेव्हा त्यात एक जुना फोटो सापडला. त्या फोटोमध्ये राहुलने तोच टी-शर्ट घातली होता जो मृतदेहाच्या बॅगेत सापडला होता. तसेच फोटोत त्याच्या हातावरील तोच टॅटू स्पष्ट दिसत होता. या पुराव्यामुळे रूबीची बोलती बंद झाली आणि चौकशीत तिने आपला गुन्हा कबूल केला.
पोलिसांनी सांगितले की, "हा एक अत्यंत क्रूर गुन्हा होता. आरोपींनी सीसीटीव्ही नसलेले रस्ते वापरून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कटर मशीन, हातोडा, रक्ताने माखलेला रॉड आणि मोबाईल जप्त केला आहे." पोलिसांनी रूबी आणि तिचा प्रियकर गौरव या दोघांनाही अटक करून कारागृहात पाठवले आहे.