इन्स्टावरची मैत्री पडली महागात; नवरदेवाला लग्नानंतर ३ दिवसांनी कळलं नवरी आहे २ मुलांची आई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 12:10 IST2025-12-03T12:09:32+5:302025-12-03T12:10:18+5:30
बंगळुरूमधील एका आयटी कंपनीत नोकरी करणारा ३४ वर्षीय श्रीधर इन्स्टाग्राम मैत्रीद्वारे मोठ्या फसवणुकीला बळी पडला.

इन्स्टावरची मैत्री पडली महागात; नवरदेवाला लग्नानंतर ३ दिवसांनी कळलं नवरी आहे २ मुलांची आई
तामिळनाडूच्या नामक्कल जिल्ह्यातील पांडमंगलम गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. बंगळुरूमधील एका आयटी कंपनीत नोकरी करणारा ३४ वर्षीय श्रीधर इन्स्टाग्राम मैत्रीद्वारे मोठ्या फसवणुकीला बळी पडला. श्रीधर बऱ्याच काळापासून लग्नासाठी एका महिलेच्या शोधात होता. या काळात त्याने इन्स्टाग्रामवर महाश्री नावाच्या महिलेशी मैत्री केली.
मैत्रीचे रूपांतर लवकरच प्रेमात झालं. श्रीधरने तिच्याबद्दल विचारपूस केली तेव्हा तिने सांगितलं की ती ३० वर्षांची असून तिरुनेलवेली जिल्ह्यातील अंबासमुद्रमची आहे आणि वराच्या शोधात आहे. काही दिवसांनी तिने त्याला प्रपोज केलं. श्रीधरने आपल्या कुटुंबाला महाश्रीबद्दल सांगितलं. सुरुवातीला कुटुंबाने आक्षेप घेतला, परंतु नंतर लग्नाला होकार दिला.
३० नोव्हेंबर रोजी पांडमंगलम येथील काशी विश्वनाथ मंदिरात या जोडप्याने लग्न केलं. महाश्रीचे काही नातेवाईकच लग्नाला उपस्थित होते. दोघांनीही इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो पोस्ट केले. पण लग्नानंतर अवघ्या तीन दिवसांत श्रीधरच्या आयुष्यात एक मोठं वादळ आलं. दुसऱ्या दिवशी सकाळी काही पुरुष श्रीधरच्या घरी कारने आले आणि त्यांनी महाश्रीवर हल्ला केला.
घरातील वातावरण पूर्णपणे बदललं. चौकशीदरम्यान समोर आलेल्या तथ्यांनी श्रीधर आणि त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. महाश्री ३० वर्षांची नसून ४२ वर्षांची असल्याचं उघड झालं. शिवाय तिचं पूर्वी लग्न झालं होतं आणि तिला दोन मुलं होती. महाश्रीच्या पहिल्या पतीने आणि त्याच्या नातेवाईकांनी तिच्यावर हल्ला केल्याचंही समोर आलं.
सत्य बाहेर आल्यानंतर, श्रीधर आणि त्याच्या कुटुंबाने महाश्रीला स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. गोंधळाच्या दरम्यान, महाश्रीला तिच्या लग्नात भेट म्हणून देण्यात आलेली ५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने देखील परत घेण्यात आले. या विश्वासघातामुळे आणि अचानक झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. वेल्लोर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.