Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 11:20 IST2025-10-26T11:19:32+5:302025-10-26T11:20:12+5:30
Gopal Badane : फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या पीडित महिला डॉक्टरने तळहातावर नोट लिहिली.

Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
"मला निष्कारण अडकवले जात आहे" अशी प्रतिक्रिया गोपाळ बदने याने दिली असून तो रात्री पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला. त्यानंतर त्याला फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात मेडिकलसाठी घेऊन जाताना बदने याने ही प्रतिक्रिया दिली आहे.
फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या पीडित महिला डॉक्टरने तळहातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली. तिने एका पीएसआय सोबतच पोलीस कर्मचाऱ्यावर आरोप केले. पीएसआय गोपाळ बदने व घर मालक प्रशांत बनकर यांची थेट नावे पीडितेने हातावर लिहित गंभीर खुलासे केले काल दुपारी प्रशांत बनकर याला पोलिसांनी कोर्टात हजर केले असता त्याला 28 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
पीडिता डॉक्टर हिने पीएसआय गोपाळ बदने याने चार वेळा बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. संपदा यांच्या आत्महत्येनंतर पीएसआय बदने फरार होता. काल रात्री उशिरा पीएसआय बदने स्वत: पोलिसांसमोर हजर झाला. पीएसआय गोपाल बदने याची एक तास कसून चौकशी केल्यानंतर त्याला मेडिकलसाठी नेण्यात आले. डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पीएसआय गोपाल बदने याला उपजिल्हा रुग्णालयात मेडिकलसाठी रात्री उशिरा नेण्यात आले.
मेडिकलसाठी नेण्यात येताना पीएसआय गोपाळ बदने याने म्हटले की, "मला निष्कारण अडकवले जात आहे" त्याचबरोबर गाडीत बसल्यानंतर माध्यमांच्या कॅमेरासमोर बदने याने हातही जोडले. पीएसआय गोपाळ बदने याला आज दुपारी कोर्टात हजर केले जाणार आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फलटण येथे दौरा असून या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.