दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा बसखाली चिरडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 15:41 IST2019-02-15T15:36:43+5:302019-02-15T15:41:14+5:30
या अपघातमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा बसखाली चिरडून मृत्यू
उल्हासनगर - भारती हिंदी हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीत शिकणारा छोटू प्रजापती व्हीनस चौकात आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास विठ्ठलवाडी एसटी बसखाली आला आणि त्याचा चिरडून जागीत मृत्यू झाला. या अपघातमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं- ५ परिसरात राहणारा छोटू प्यारेलाल प्रजापती-१५ हा कॅम्प नं-३ येथील भारती हिंदी हायस्कुलमध्ये दहावी इयत्तेत शिकत होता. सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान सायकल वरून शाळेला जात असताना व्हीनस चौकात विठ्ठलवाडी आगार परिवहन बसच्या खाली सापडून जागीच ठार झाला. अपघाताची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, पंचनामा केला. तसेच मृत छोटू प्रजापती याला मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करून आई-वडील व शाळेला माहिती दिली.
एसटी परिवहन बस चालकाने विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठून स्वतः पोलिसांच्या ताब्यात दिले. तर पोलिसांनी बस ताब्यात घेऊन पोलीस ठाण्या समोर उभी केली आहे. सदर घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून शहरातील वाहतूक समस्या बघता मुलांकडे सायकली देऊ नका, असे आवाहन समाजसेवी संघटनेने केले आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.