बहिणीशी का बोलू देत नाही म्हणत विद्यार्थ्यावर सपासप चाकूने केले वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 18:48 IST2022-08-03T18:47:40+5:302022-08-03T18:48:15+5:30
Stabbing Case : वायगाव येथील घटना, जखमीवर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरु

बहिणीशी का बोलू देत नाही म्हणत विद्यार्थ्यावर सपासप चाकूने केले वार
वर्धा : महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्याला प्रवेशद्वाराजवळ अडवून तुझ्या बहिणीशी का बोलू देत नाही, असे म्हणत मानेवर आणि पाठीवर चाकूने सपासप वार करीत गंभीर जखमी केल्याची घटना वायगाव (नि.) गावात ३ रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. आशिष वावरे (२५) रा. खामगाव गोटाडे असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याच्यावर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आशिष वावरे हा वायगाव येथील आयटीआय महाविद्यालयात जात असताना आरोपी संकेत बहादुरे रा. चितोडा याने त्याला महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच अडविले. दरम्यान आरोपी संकेत याने आशिषला तु तुझ्या बहिणीला माझ्यासोबत का बोलू देत नाही, तसेच ही बाब तुझ्या वडिलांना का सांगितली, असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान दोघांमध्ये शाब्दीक चकमक झाली. संतापलेल्या संकेतने आशिषच्या मानेवर आणि पाठीवर चाकूने सपासप वार करीत त्यास गंभीर जखमी केले. ही बाब परिसरात उपस्थित असलेल्या त्याच्या मित्रांना दिसताच त्यांनी धाव घेतली. जखमी आशिषला सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. याप्रकरणी देवळी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास देवळी पोलीस करीत आहेत.