आईच्या चारित्र्यावर बाप घेत होता संशय; अखेर छातीत चॉपर खुपसून मुलाने केली त्याची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 15:10 IST2021-09-12T15:03:00+5:302021-09-12T15:10:34+5:30
Murder Case : जळगावातील घटना : दवाखान्यात जाण्यावरुन पडली वादाची ठिणगी

आईच्या चारित्र्यावर बाप घेत होता संशय; अखेर छातीत चॉपर खुपसून मुलाने केली त्याची हत्या
जळगाव : सतत आईच्या चारित्र्यावर संशय घेत असलेल्या प्रेमसिंग अभयसिंग राठोड (वय ५०, मुळ रा.घनश्यामपूर, ता.खकनार, जि.बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) यांचा मुलाने छातीत चॉपर खोपसून खून केल्याची घटना रविवारी सकाळी साडे दहा वाजता निमखेडी शिवारातील कांताई नेत्रालयाजवळ घडली. गोपाल व दीपक या दोन्ही मुलांना पोलिसांनीअटक केली आहे. प्रेमसिंग याला दवाखान्यात नेण्याच्या कारणावरुन वादाची ठिणगी पडली अन् खुनाची घटना घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळावरुन नातेवाईक व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमसिंग राठोड याला कानाचा त्रास होता. रविवारी त्याला शहरातील दवाखान्यात नेऊन नंतर बऱ्हाणपूर येथे घेऊन जाण्याबाबत मुलगा गोपाल व दीपक या दोघांनी आग्रह केला. यावेळी प्रेमसिंग याने त्यास विरोध करुन तिकडे गेल्यावर मागे पत्नी दुसऱ्या लोकांच्या संपर्कात राहते असे बोलून तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. त्यामुळे मुले व बाप यांच्यात वाद झाला. दीपक याने दांडक्याने बापाला मारले तर प्रेमसिंग याने घरात लपवून ठेवलेला चॉपर आणून दोन्ही मुलांवर हल्ला करणार तितक्यात गोपाल याने हा चॉपर हिसकावून प्रेमसिंग याच्या छातीवर, डोक्यावर कमरेजवळ वार केले. त्यात प्रेमसिंग जागीच गतप्राण झाला.