विम्यासाठी भयंकर कट! आधी आई, मग पत्नी, आता वडिलांचा मृत्यू...; पैशांसाठी लेक झाला हैवान
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 11:34 IST2025-09-29T11:33:17+5:302025-09-29T11:34:10+5:30
विम्याचे पैसे हडपण्यासाठी मुलाने त्याचे आई-वडील आणि पत्नीच्या मृत्यूचा भयंकर कट रचला.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशातील हापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विम्याचे पैसे हडपण्यासाठी मुलाने त्याचे आई-वडील आणि पत्नीच्या मृत्यूचा भयंकर कट रचला. सर्वात आधी त्याने सर्वांचा कोट्यवधी रुपयांचा विमा काढला, नंतर त्यांना एक-एक करून कुटुंबीयांनाच मारलं. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
निवा बुपाच्या प्रतिनिधीने विविध विमा कंपन्यांकडे ५० कोटी रुपयांचा दावा केल्याबद्दल विशाल कुमारविरुद्ध हापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विम्याचे पैसे मिळवण्यासाठी विशालने फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्याने त्याच्या पालकांच्या मृत्यूचा कट रचला. पोलिसांनी विशाल कुमार आणि त्याच्या मित्राला हापूरमधील मोदीनगर रोड येथून अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशालचे वडील मुकेश सिंघल यांचा एका अपघातात मृत्यू झाला, परंतु शवविच्छेदन अहवाल आणि अपघाताच्या तपशीलांमध्ये तफावत आढळून आली. मुकेश सिंघल यांनी अनेक विमा कंपन्यांकडून अंदाजे ३९ कोटींचा विमा काढला होता. विमा कंपनी निवा बुपा याचे प्रतिनिधी संजय कुमार यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासात असंही समोर आले आहे की, विशालला त्याच्या आई आणि पत्नीच्या मृत्यूनंतर लाखो रुपये विमा दाव्यांमध्ये मिळाले होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, विशालच्या आईचाही २०१७ मध्ये एका अपघातात मृत्यू झाला होता, त्यानंतर त्याला ८० लाखांचा विमा मिळाला होता. याव्यतिरिक्त त्याच्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्याला ३० लाख मिळाले होते.
हापूर सीओ सिटी वरुण मिश्रा यांनी सांगितलं की विशाल आणि सतीश यांनी ही घटना घडवून आणली. पोलिसांना हा एका मोठ्या गुन्हेगारी कटाचा भाग असल्याचा संशय आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. विशाल कुमारची आई प्रभा देवी यांचं २१ जून २०१७ रोजी पिलखुवा येथे झालेल्या अपघातात निधन झालं. त्यांच्या मृत्यूनंतर विशालला विमा कंपन्यांकडून अंदाजे ८० लाख रुपये मिळाले.