पुण्याच्या मुलीशी ब्रेकअप अन् घरच्यांना संपवण्याचा कट, जुळ्या बहिणीवर वार करुन हत्या, आईवर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 23:17 IST2026-03-07T23:02:39+5:302026-03-07T23:17:46+5:30
उत्तर प्रदेशात नैराश्यातून एका तरुणाने बहिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुण्याच्या मुलीशी ब्रेकअप अन् घरच्यांना संपवण्याचा कट, जुळ्या बहिणीवर वार करुन हत्या, आईवर हल्ला
UP Crime: होळीचा सण म्हणजे आनंदाचा आणि एकत्र येण्याचा सोहळा. मात्र, उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये याच सणादरम्यान एका कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला आहे. गुरुग्राममध्ये नोकरी करणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणाने आपल्याच जुळ्या बहिणीची अत्यंत क्रूरपणे हत्या केली आणि त्यानंतर आपल्या आईवरही खुनी हल्ला चढवला. ब्रेकअपमुळे आलेल्या नैराश्यातून आणि रागातून हे हत्याकांड घडल्याचे समोर आले आहे.
मुरादाबादच्या मझोला पोलीस स्टेशन हद्दीतील बुद्धी विहार कॉलनीमध्ये नीलिमा या आपल्या मुलांसह राहतात. त्यांची २५ वर्षांची जुळी मुले, हार्दिक आणि हिमशिखा, दोघेही गुरुग्राममध्ये नोकरीला होते. होळी साजरी करण्यासाठी हे दोघेही घरी आले होते. शुक्रवारी ते परत गुरुग्रामला जाणार होते, पण त्यापूर्वीच काळाने घाला घातला.
घरात घुसून बहिणीवर ४० वार
मिळालेल्या माहितीनुसार, आई नीलिमा आपल्या कामावर गेल्या होत्या. घरी हार्दिक आणि त्याची बहीण हिमशिखा दोघेच होते. अचानक हार्दिकने स्वयंपाकघरातील चाकू उचलला आणि बेडवर असलेल्या बहिणीवर तुटून पडला. रागाच्या भरात त्याने हिमशिखाच्या शरीरावर ४० पेक्षा जास्त वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बहिणीला तसंच सोडून तो आईवर हल्ला करण्यासाठी निघाला.
आईलाही मारण्याचा प्रयत्न
बहिणीची हत्या केल्यानंतर हार्दिकने आईला काहीतरी कारण सांगून घरी बोलावले. आई घरात शिरताच रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलीला पाहून त्यांनी टाहो फोडला. त्याच क्षणी हार्दिकने आईवरही चाकूने हल्ला केला. आईच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी धावून आले, तोपर्यंत हार्दिक कार घेऊन पसार झाला होता.
इन्स्टाग्रामवरील प्रेम आणि ब्रेकअप
पोलीस तपासात या हत्येमागील धक्कादायक कारण समोर आले आहे. हार्दिकचे पुण्यातील एका मुलीसोबत इन्स्टाग्रामवर प्रेम जडले होते. सात महिन्यांपूर्वी त्यांचे ब्रेकअप झाले, ज्यामुळे हार्दिक प्रचंड नैराश्यात होता. हार्दिकला वाटायचे की, त्याच्या आई आणि बहिणीमुळेच त्याचे प्रेमसंबंध तुटले आहेत. तो सातत्याने त्यांच्यावर संशय घेत होता आणि छोट्या-छोट्या गोष्टींवरून चिडचिड करत असे.
पोलिसांसमोर दिलेली कबुली
पोलिसांनी हार्दिकला ताब्यात घेतले असून त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. "ब्रेकअपनंतर मी डिप्रेशनमध्ये होतो. आई आणि बहिणीने मला समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्या दिवशी माझा संयम सुटला आणि मी त्यांच्यावरच वार केले," असे त्याने चौकशीत सांगितले.
प्रकृती चिंताजनक
बहीण हिमशिखाचा जागीच मृत्यू झाला असून, आई नीलिमा यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. एका प्रेमप्रकरणाच्या अपयशातून एका सुशिक्षित तरुणाने आपल्याच हसत्या-खेळत्या कुटुंबाचा नाश केल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.