श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 15:24 IST2025-08-21T15:21:34+5:302025-08-21T15:24:45+5:30
श्वेताने आणि रवि अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. रवि विवाहित होता, पण श्वेतासोबत लग्न करण्यासाठी पत्नीला सोडायलाही तयार झाला होता.

श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
Relationship Crime News: ३२ वर्षीय श्वेताची तिच्या विवाहित प्रियकराने हत्या केली. विवाहित असलेल्या रविला श्वेतासोबत लग्न करायचे होते. त्याने तिला तसा प्रस्ताव दिला, मात्र ती नाही म्हणाली. त्यानंतर दोघांमध्ये बिनसले. रवि कारने श्वेताला एका तलावाकडे घेऊन गेला. रागाच्या भरात त्याने कारच तलावात घातली. यात श्वेताचा बुडून मृत्यू झाला, तर रवि पोहत काठावर आला. त्याने नियंत्रण सुटून कार तलावात बुडाल्याचे पोलिसांना सांगितले, पण तपासातून त्याने हत्या केल्याचे उघड झाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ही घटना कर्नाटकातील हासन जिल्ह्यामध्ये घडली आहे. बेलूर तालुक्यात असलेल्या चंदनहल्ली परिसरात राहणाऱ्या ३२ वर्षीय श्वेताला तिच्याच प्रियकराने संपवले. पोलिसांनी आरोपी रवीला अटक केली आहे.
रवि आणि श्वेताची नोकरी करताना झाली होती ओळख
श्वेता आणि रविची जुनी ओळख होती. काही वर्षांपूर्वी ते भेटले आणि मित्र बनले. हासनमध्ये काम करत असताना त्यांची पहिल्यांदा भेट झाली होती. श्वेताला भेटण्यापूर्वीच रविचे लग्न झाले होते. पण, दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले.
श्वेताचेही लग्न झालेले होते. ती पतीपासून विभक्त राहत होती. सध्या ती आईवडिलांकडेच राहायला होती. दरम्यान, रविने श्वेताला लग्न करण्याचा प्रस्ताव दिला. मात्र, तिने लग्न करण्यास नकार दिला. रवि श्वेतासाठी त्याच्या पत्नीलाही सोडायला तयार झाला होता, पण तिने नकार दिल्याने त्याला राग आला.
श्वेताला कारमध्ये बसवले आणि...
पोलिसांना सांगितले की, रवि रविवारी श्वेताला कारमध्ये बसवून चंदनहल्लीमधील तलावाकडे घेऊन गेला. तिथे गेल्यानंतर अचानक त्याने कार तलावात घातली. कार पाण्यात बुडायला लागल्यानंतर रवि कारमधून बाहेर पडला. तर दरवाजा उघडत नसल्याने श्वेता कारमध्येच अडकली आणि बुडून मेली.
श्वेताचा मृत्यू झाल्यानंतर या घटनेची माहिती गावात पसरली. रविने पोलिसांना सांगितले की, कार अचानक तलावात कोसळली आणि मी कसातरी वाचलो. पोहत बाहेर आलो. हा एक अपघात होता.
रविच्या दाव्यावर पोलिसांना आला संशय
श्वेताच्या मृत्यूबद्दल रविने सांगितलेल्या घटनाक्रमाबद्दल पोलिसांना संशय आला. श्वेताच्या कुटुंबीयांना तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. श्वेताचा पोस्टमार्टम रिपोर्ट आणि साक्षीदारांनी दिलेल्या जबाबामुळे हा अपघात नसून, विचारपूर्वक केलेली हत्या असल्याचे पोलिसांना तपासातून आढळून आले.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून रवीला अटक केली. अहराहल्ली पोलीस या प्रकरणाचा आता तपास करत आहे.