आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील चिलुवुरू गावात एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली. एवढेच नाही तर, हत्येनंतर या महिलेने रात्रभर पतीच्या मृतदेहाशेजारी झोपून अश्लील व्हिडिओ (पोर्न) बघितले. लक्ष्मी माधुरी असे आरोपी महिलेचे नाव असून पोलिसांनी तिला अटक केली आहे.
असं आहे संपूर्ण प्रकरण - न्यूज१८ ने दिलेल्या वृत्तानुसार, माधुरीने प्रियकर गोपीच्या सातीने पती लोकम शिव नागराजू याच्या हत्येचा कट रचला. घटनेच्या रात्री तिने पतीसाठी खास बिरयानी बनवली आणि त्यात गुंगीचे औषध मिसळले. रात्री ११:३० च्या सुमारास प्रियकर गोपी तिच्या घरी पोहोचला आणि त्याने नागराजूच्या छातीवर जोरात प्रहार केले आणि उशीने तोंड दाबून त्याची हत्या केली. नागराजूचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर गोपी तेथून निघून गेला. यानंतर माधुरी रात्रभर मृतदेहाशेजारी पडून फोनवर अश्लील व्हिडिओ बघत राहिली.
यानंतर, सकाळी ४ वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी माधुरीने शेजाऱ्यांकडे जाऊन पतीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा बनाव रचला. मात्र, मृतदेहाच्या कानातून रक्त येत असल्याचे पाहून आणि माधुरीच्या प्रेमप्रकरणाची कुणकुण असल्याने शेजाऱ्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनाच्या अहवालात नागराजूचा मृत्यू गुदमरून झाल्याचे आणि छातीत फ्रॅक्चर असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी खाक्या दाखवताच लक्ष्मी माधुरीनं दिली गुन्ह्याची कबुली - तपासादरम्यान, पोलिसांनी खाक्या दाखवताच लक्ष्मी माधुरीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आणि हत्येनंतर रात्रभर अश्लील व्हिडिओ पाहिल्याचेही मान्य केले. सध्या माधुरी पोलिसांच्या ताब्यात असून तिचा प्रियकर गोपी अद्याप फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.