धक्कादायक ! येरवडा कारागृहातून मोक्यासह गंभीर गुन्ह्यातील पाच आरोपींचे पलायन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 10:39 IST2020-07-16T10:20:42+5:302020-07-16T10:39:10+5:30
तात्पुरत्या कारागृहातून खिडकीचे गज तोडून आरोपी पळून जाण्याची चौथी घटना

धक्कादायक ! येरवडा कारागृहातून मोक्यासह गंभीर गुन्ह्यातील पाच आरोपींचे पलायन
पुणे : येरवडा तात्पुरत्या कारागृहातून मोक्यासह गंभीर गुन्ह्यातील पाच आरोपी गुरुवारी पहाटे खिडकीचे गज तोडून पळून गेल्याची गंभीर घटना गुरुवारी पहाटे घडली. येरवडा तात्पुरत्या कारागृहातून आरोपी पळून जाण्याची ही चौथी घटना आहे. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर न्यायाधीन बंदी तात्पुरत्या कारागृहात ठेवण्यात येत आहेत. वारंवार बंदी पळून जाण्याच्या घटनेमुळे कारागृहाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
पळून गेलेल्या आरोपींमध्ये देवगण अजिनाथ चव्हाण, गणेश आजिनाथ चव्हाण( दोघेही रा. बोरावके नगर, तालुका दौंड, पुणे), अक्षय कोडक्या चव्हाण, ( रा. लिंगाळी माळवाडी, तालुका दौंड, पुणे), अजिंक्य उत्तम कांबळे (रा. सहकार नगर टिळेकर वाडी),
येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास येरवडा येथील जात पडताळणी कार्यालयाच्या आवारातील तात्पुरत्या कारागृहाच्या इमारत क्रमांक चारच्या पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक ५ मधील खिड़कीचे दोन गज उचकटून तोडून टाकून ५ आरोपी पळून गेल्याचा प्रकार बंदोबस्तावरील पोलिसांच्या लक्षात आला.
येरवडा तात्पुरत्या कारागृहात सध्या एकूण ५६८ न्यायाधीन बंदी ठेवण्यात आलेले आहेत. बंदी पळून जाण्याच्या वारंवार होणाऱ्या घटनांमुळे सध्या पुणे पोलीस आयुक्तालय कडील दोन अधिकारी, बारा कर्मचारी, काराग्रह विभागाचा एक अधिकारी व १८ कर्मचारी असा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. मात्र तरीदेखील बंदी पळून जाण्याच्या घटनांचे सत्र सुरूच आहे.याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू करण्यात आले असून अधिक तपास येरवडा पोलिस करीत आहेत.