५ वेळा मदत मागायला गेली, तरी दुर्लक्ष; पालकांना 'ऍडजस्ट' करायला सांगणाऱ्या शिक्षिकेच्या बेफिकिरीमुळे गेला चिमुरडीचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 16:01 IST2025-11-22T15:11:34+5:302025-11-22T16:01:24+5:30
Jaipur School Girl Death: जयपूरमधील नीरजा मोदी स्कूलमध्ये इयत्ता चौथीतील एका ९ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या ...

५ वेळा मदत मागायला गेली, तरी दुर्लक्ष; पालकांना 'ऍडजस्ट' करायला सांगणाऱ्या शिक्षिकेच्या बेफिकिरीमुळे गेला चिमुरडीचा जीव
Jaipur School Girl Death: जयपूरमधील नीरजा मोदी स्कूलमध्ये इयत्ता चौथीतील एका ९ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. या हृदयद्रावक प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या सीबीएसई समितीच्या अहवालातून शाळा व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा खुलासा झाला आहे. शाळेच्या दुर्लक्षामुळे सीबीएसईने आता शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
चौकशी अहवालानुसार, मृत विद्यार्थिनीला गेल्या १८ महिन्यांपासून तिच्या वर्गमित्रांकडून सातत्याने शाब्दिक छळ आणि अत्याचाराला सामोरे जावे लागत होते. पालकांनी जुलै २०२४ मध्ये शिक्षकांकडे तक्रार केली होती. तर सप्टेंबर २०२५ मध्ये वडिलांनी एका मुलाला तिला छळताना पाहून थेट वर्गशिक्षकांकडे धाव घेतली होती. मात्र शाळेने कोणतीही कारवाई केली नाही. इतकेच नाही, तर शिक्षिकेने वडिलांना, मुलीने जुळवून घ्यावे असा सल्ला दिला होता. दीड वर्षांत तीनपेक्षा जास्त वेळा तक्रारी होऊनही शाळेच्या अँटी-बुलिंग कमिटीने एकदाही हस्तक्षेप केला नाही.
शेवटच्या ४५ मिनिटांत ५ वेळा शिक्षिकेकडे धाव
सीबीएसई समितीच्या अहवालानुसार, आत्महत्येपूर्वीच्या शेवटच्या ४५ मिनिटांत ती मुलगी वर्गातील शिक्षिकेकडे मदतीसाठी पाच वेळा गेली होती. परंतु शिक्षिकेने तिच्या तक्रारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. शिक्षिकेने स्वतःच्या जबाबात कबूल केले की मुलगी त्रासलेली होती, पण त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. उलट तिच्यावर ओरडले होते. यामुळे सीबीएसईने शिक्षिकेच्या निष्काळजीपणावर तीव्र ताशेरे ओढले आहेत.
सुरक्षा आणि संरचनेत गंभीर त्रुटी
छळाच्या तक्रारींव्यतिरिक्त, समितीला शाळेत अनेक सुरक्षा आणि पायाभूत सुविधांच्या त्रुटीही आढळल्या आहेत. ज्या जिन्यावरून मुलीने उडी मारली, त्याचे कठडे सहजपणे चढता येण्यासारखे होते. अपुरे सीसीटीव्ही मॉनिटरिंग, तसेच मुलीला त्रास होत असतानाही शाळेने तिला कोणताही मानसिक आधार न देणे, हे सीबीएसई मार्गदर्शक तत्त्वांचे थेट उल्लंघन असल्याचे अहवालात नमूद आहे.