अनेक तरुणींचे शोषण केले, नऊ जणींना फूस लावून पळवले; ५ लाखांचे बक्षीस असलेला लव्हगुरू अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 15:53 IST2020-09-14T15:50:12+5:302020-09-14T15:53:27+5:30
सोशल मीडियावर लव्हगुरू म्हणून कुख्यात असलेल्या या आरोपीला लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. मात्र तो नंतर पॅरोलवर सुटून पसार झाला होता.

अनेक तरुणींचे शोषण केले, नऊ जणींना फूस लावून पळवले; ५ लाखांचे बक्षीस असलेला लव्हगुरू अटकेत
नवी दिल्ली - अनेक तरुणींचा लैंगिक शोषण करणाऱ्या आणि नऊ जणींना फूस लावून पळवणाऱ्या कुख्यात लव्हगुरूला दिल्ली पोलिसांच्या क्राइमब्रँच आणि इंटरस्टेट सेलने अटक केली आहे. हिमाचल प्रदेशमधील सोलन जिल्ह्यातील बद्दी येथून अटक करण्यात आली. पेशाने शिक्षक असलेल्या या तथाकथित लव्हगुरूचे नाव धवल त्रिवेदी असून, त्याच्या कारनाम्यांमुळे सीबीआयने त्याच्या नावावर पाच लाख रुपयांचे ईनाम ठेवले होते.
सोशल मीडियावर लव्हगुरू म्हणून कुख्यात असलेल्या धवल याला लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. मात्र तो नंतर पॅरोलवर सुटला होता. धवल त्रिवेदी याने अनेक महिला आणि अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केले होते. तर ९ महिलांना त्याने आपल्या प्रेमपाशात ओढून पळवून नेले होते. यामध्ये एका अल्पवयीन मुलीचाही समावेश होता. त्रिवेद हा २०१८ पासून फरार होता. मुंबई सीबीआयने त्याच्यावर ५ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.
धवल हा कुख्यात गुन्हेगार असून, त्याला आपल्या गुन्ह्याबाबत अजिबात खेद नाही आहे. त्याने पोलिसांना सांगितले की, मी एक पुस्तक लिहिण्याचा विचार करत असून, त्याचे नाव १० परफेक्ट वुमन इन माय लाइफ असे ठेवणार आहे. गुजरातमधील राजकोट पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्याअंतर्गत दाखल खटल्यामध्ये धवल त्रिवेदी याला दोषी ठरवून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र नंतर तो पॅरोलवर फरार झाला होता.
नंतर त्याच्या शोधासाठी तपास मुंबई सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. या काळात तो नाव बदलून वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. या प्रकरणाचे गांभीर्य विचारात घेऊन आरोपीबाबत गोळा केलेली माहिती गोपनीय ठेवण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनी अखेरीस हिमाचल प्रदेशमधील बद्दी परिसरात आरोपीचे लोकेशन पकडले. त्यानंतर इन्स्पेक्टर नीरज चौधरी आणि एससीपी संदीप लांबा यांच्या पथकाने हिमाचल प्रदेशमध्ये जाऊन या आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले
शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी