लग्नाचा हट्ट सोडवण्यासाठी ११ वीतील प्रेयसीची चाकूने भोसकून हत्या; रस्त्यावर फेकलेल्या बॅगमुळे सापडला आरोपी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 15:29 IST2025-11-18T15:29:16+5:302025-11-18T15:29:43+5:30
लग्नाचा तगादा लावल्याने उत्तर प्रदेशात एका तरुणाने प्रेयसीची निर्घृणपणे हत्या केली.

लग्नाचा हट्ट सोडवण्यासाठी ११ वीतील प्रेयसीची चाकूने भोसकून हत्या; रस्त्यावर फेकलेल्या बॅगमुळे सापडला आरोपी
UP Crime:उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये नदीकिनारी ११ वीमध्ये शिकणाऱ्या साक्षी यादवचा मृतदेह सापडल्यानंतर अवघ्या ४८ तासांत पोलिसांनी या हत्याकांडाचा खुलासा केला आहे. एका तरुणाने साक्षी यादवची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. साक्षी यादवचा मृतदेह सापडल्यानंतर दोन दिवसांतच पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी हत्येचा गुन्ह्याचा उलगडा केला. या प्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.
इन्स्टाग्रामवर मैत्री, लग्नाच्या दबावामुळे खून
जून २०२५ मध्ये इन्स्टाग्रामवर साक्षी आणि तरुणाची ओळख झाली आणि त्यानंतर त्यांची जवळीक वाढली. मात्र, तरुणाचे सहा महिन्यांपूर्वीच दुसरीकडे लग्न ठरलं होतं. ३० नोव्हेंबर रोजी त्याचा विवाह होणार होता. तरुणाने इन्स्टाग्रामवर होणाऱ्या पत्नीचा फोटो पोस्ट केल्यानंतर साक्षीला याची माहिती मिळाली. त्यानंतर ती वारंवार तरुणावर माझ्याशीच लग्न कर असा दबाव आणू लागली. लग्नाच्या तक्रारीमुळे तरुण पूर्णपणे त्रस्त झाला होता आणि साक्षीचा कायमच पिच्छा सोडवण्यासाठी त्याने तिची हत्या करण्याचा कट रचला.
१० नोव्हेंबर रोजी सकाळी कॉलेजला जात असताना साक्षी बेपत्ता झाली होती. त्याच दिवशी संध्याकाळी तरुण तिला आपल्या दुचाकीवर बसवून मनसैता नदीकिनारी निर्जनस्थळी घेऊन गेला. तिथे त्याने चाकूने तिच्यावर सपासप वार करून तिची हत्या केली. गुन्हा लपवण्यासाठी त्याने एका मंदिराजवळ ठेवलेल्या फावड्याच्या मदतीने मोठा खड्डा खणला आणि साक्षीचा मृतदेह पुरून टाकला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने वापरलेला चाकू आणि फावडाही जमिनीत गाडून टाकला. यानंतर साक्षीची बॅग त्याने महामार्गाजवळ देवरिया गावाजवळ फेकून दिली आणि घरी परतला.
१५ नोव्हेंबरच्या सकाळी लखरावा गावात जमिनीतून एक मानवी हात बाहेर आल्याचे दिसल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा साक्षीच्या कुटुंबाकडून ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्याचे समजले. पोलिसांनी केलेल्या सखोल तपासणीत अनेक महत्त्वाचे धागेदोरे मिळाले.सीसीटीव्ही फुटेजमध्ये तरुण साक्षीला दुचाकीवर घेऊन जाताना दिसला. त्यानंतर साक्षीच्या बॅगमध्ये आरोपीचा मोबाईल क्रमांक लिहिलेली वही सापडली. या पुराव्यांच्या आधारावर पोलिसांनी तरुणाला अटक केली. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेला चाकू आणि मृतदेह पुरण्यासाठी वापरलेला फावडाही जप्त केला आहे.