हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 17:38 IST2025-10-29T17:32:44+5:302025-10-29T17:38:07+5:30
ही हत्या नसून आत्महत्याच आहे ही वस्तूस्थिती आहे. त्या महिला याआधी कधीही आमच्या हॉटेलला आलेल्या नाहीत असंही हॉटेल मालक दिलीप भोसले यांनी सांगितले.

हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
सातारा - फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. एका हॉटेलमध्ये या तरूणीने आत्महत्या केली. ती हॉटेलमध्ये जातानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले. आता या घटनेच्या संपूर्ण घटनाक्रमावर हॉटेल मालकाने उलगडा केला आहे.
याबाबत मधुदीप हॉटेलचे मालक दिलीप भोसले म्हणाले की, मूळात हत्या हा शब्द चुकीचा आहे. सुषमा अंधारे यांनीच हत्येचा आरोप केला. ही हत्या नाही. आम्ही ३२ वर्षापासून हॉटेल व्यवसाय करतोय. बिझनेस करत असताना ग्राहक २४ तासांत कधीही आला त्यावेळी रूम मोकळी असेल तर त्यांना सेवा देणे आमचे काम आहे. त्याच पद्धतीने रात्री १.३० वाजता आलेल्या महिला डॉक्टर आमच्या हॉटेलवर आल्या. त्यांनी आमच्या वॉचमनकडे रूम मागितली. मला बारामतीला जायचंय, रात्री जाणे शक्य नाही. त्यामुळे मी इथे मुक्काम करायचं ठरवले आहे. मला रूम द्या असं तिने म्हटले. त्यानंतर आधारकार्ड घेऊन रूमची चावी त्यांना दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी ९ पर्यंत त्या उठल्या नाहीत. संध्याकाळी ५ वाजले तरीही उठल्या नाहीत. मग संशय आल्यानंतर आम्ही पोलिसांना फोन केला. त्यानंतर दुसऱ्या चावीने रूम उघडला, त्यावेळी व्हिडिओ शूट सुरू होते. आतमध्ये पाहताच महिलेचा मृतदेह त्यांच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पाहायला मिळाल्या असं त्यांनी सांगितले.
तसेच आम्ही ताबडतोब दार बंद केले, त्यानंतर पोलीस यायची वाट पाहिली. रात्री दीड वाजता त्या आल्यानंतर दुसऱ्यादिवशी संध्याकाळपर्यंत कुणीही त्यांच्या खोलीत गेले नव्हते. याचेही सीसीटीव्ही रेकॉर्ड आहेत. त्यामुळे ही आत्महत्याच झाली आहे. त्या महिलेला कुठले नैराश्य होते, का त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले याची आम्हाला माहिती नाही. माध्यमांमध्ये आल्यानंतर या गोष्टीमागे अनेक गुंतागुंत असल्याचे कळले. सकाळी साडे नऊ वाजता त्यांचा फोन झाला होता. त्यामुळे सकाळपर्यंत त्या जिवंत होत्या. ही हत्या नसून आत्महत्याच आहे ही वस्तूस्थिती आहे. त्या महिला याआधी कधीही आमच्या हॉटेलला आलेल्या नाहीत असंही हॉटेल मालक दिलीप भोसले यांनी सांगितले.
दरम्यान, गेली १० वर्षाचा रेकॉर्ड काढून पाहिला तरीही त्या महिला कधीच आमच्याकडे आलेल्या नाहीत. या महिला वारंवार हॉटेलला यायच्या हे आरोप खोटे आहेत. सकाळी ९ ते १० आम्ही रोजप्रमाणे रूमचा दरवाजा वाजवला, परंतु आतून काही प्रतिसाद आला नाही. त्या रात्री उशिरा आल्या असतील म्हणून झोपल्याचा अंदाज आला. मात्र संध्याकाळपर्यंत काहीच हालचाल नसल्याने धाकधूक वाढायला लागली. संध्याकाळी पोलिसांना फोन केला. ती रूम उघडेपर्यंत कुणीही आत गेले नाही असंही हॉटेल मालकांनी म्हटलं.