"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 18:13 IST2025-07-18T18:12:48+5:302025-07-18T18:13:13+5:30

सोशल मीडियावर अश्लीलता पसरवण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केलेल्या उत्तर प्रदेशातील संभळ जिल्ह्यातील मुलींची आता गावकऱ्यांनीच पोलखोल केली आहे.

sambhal mehak pari viral reels villagers exposed girls secret scolded them fiercely for making obscene videos | "इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

फोटो - आजतक

सोशल मीडियावर अश्लीलता पसरवण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केलेल्या उत्तर प्रदेशातील संभळ जिल्ह्यातील मुलींची आता गावकऱ्यांनीच पोलखोल केली आहे. मेहक आणि निशा उर्फ परीमुळे त्यांचं गाव बदनाम झालं आहे. या मुलींमुळे गावकऱ्यांना आता इतकी लाज वाटते की, बाहेर गेल्यावर ते दुसऱ्या गावचे रहिवासी असल्याचं सांगतात.

शाहबाजपूर कला गावातील एका ग्रामस्थाने दिलेल्या माहितीनुसार, मेहक आणि परीचे सोशल मीडियावर ४ लाख फॉलोअर्स असले तरी गावातील चार लोकांनाही त्या आवडत नाहीत. त्यांच्याशी कोणीही बोलत नाही आणि कोणालाही त्यांच्यात रस नाही. गावकऱ्यांनी अश्लील व्हिडीओ बनवण्यास नकार दिला तर ते पोलिसांना फोन करण्याची धमकी देत असत. 

"आमच्या घरात आमच्या बहिणी आणि मुलीही आहेत. मेहक आणि परीच्या कृत्यांमुळे सर्वांनाच त्रास होतो. यांच्यामुळे गावातील वातावरण बिघडत चाललं आहे. जर दोघींना काहीही बोललं तर त्या खोटे आरोप करून पोलीस ठाण्यात जायच्या. यानंतर पोलीस लोकांना अटक करायचे. संपूर्ण गाव या दोघींच्या कृत्यांना कंटाळलं आहे. त्या अनेकदा भांडायच्या" असंही एका गावकऱ्याने म्हटलं आहे. 

गावातील महिलांनी सांगितलं की, "या मुलींमुळे इतका त्रास झाला आहे की परिसर सोडून जावासं वाटतं. मात्र पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे आशा निर्माण झाली आहे. आता तरी त्या घाणेरडं कृत्य करणं थांबवतील. त्यांचे सोशल मीडियावर फॉलोअर्स असतील पण गावात त्यांना कोणीही फॉलो करत नाहीत, उलट प्रत्येकजणच त्यांचा शत्रू आहे. जर तुम्ही गावच्या मुली असाल तर तुम्ही मुलींसारखं वागलं पाहिजे, अश्लील व्हिडीओ बनवण्याचं काम करू नका."

संभळच्या असमोली पोलीस स्टेशन परिसरातील शाहबाजपूर कला गावातील तीन मुली - मेहक, निशा उर्फ परी, हिना आणि त्यांचा साथीदार कॅमेरामन जरार आलम यांना काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्यावर सोशल मीडियावर अश्लील व्हिडीओ अपलोड केल्याचा आरोप आहे, ज्यामध्ये अश्लीलता, अश्लील हावभाव, शिवीगाळ आहे. आजतकने याबाबतचे वृत्त दिलं आहे. 
 

Web Title: sambhal mehak pari viral reels villagers exposed girls secret scolded them fiercely for making obscene videos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.