सैराट! प्रेमाला विरोध, पोटच्या लेकीचं कुंकू पुसलं; घरात घुसून जावयावर झाडल्या गोळ्या, परिसर हादरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 11:08 IST2026-01-13T11:07:48+5:302026-01-13T11:08:37+5:30
"माझ्या पतीला सोडून द्या, त्यांना मारू नका," अशी विनवणी लेक करत होती, पण क्रूर बापाने काहीही न ऐकता आठ महिन्यांच्या नातवासमोरच जावयाच्या डोक्यात गोळी झाडून त्याची हत्या केली.

सैराट! प्रेमाला विरोध, पोटच्या लेकीचं कुंकू पुसलं; घरात घुसून जावयावर झाडल्या गोळ्या, परिसर हादरला
प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून एका बापाने आपल्याच लेकीचा संसार उद्ध्वस्त केल्याची धक्कादायक घटना बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये घडली आहे. "माझ्या पतीला सोडून द्या, त्यांना मारू नका," अशी विनवणी लेक करत होती, पण क्रूर बापाने काहीही न ऐकता आठ महिन्यांच्या नातवासमोरच जावयाच्या डोक्यात गोळी झाडून त्याची हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून 'ऑनर किलिंग'च्या या प्रकरणाने माणुसकीला काळीमा फासला आहे.
डोळ्यादेखत उद्ध्वस्त झाला संसार
सिवाईपट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बनघरा गावात आयुष कुमार हा आपल्या पत्नीसोबत राहत होता. रविवारी रात्री आयुष, त्याची पत्नी तनु आणि त्यांचा आठ महिन्यांचा चिमुरडा झोपलेले असताना ही काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. तनुचे वडील प्रेम कुमार भगत हे आपल्या साथीदारांसह घरात घुसले. त्यांनी आधी तनुला दोरीने बांधले आणि त्यानंतर आयुषला जमिनीवर पाडून त्याच्या डोक्यात थेट गोळी झाडली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आयुषचा जागीच मृत्यू झाला.
१५ ऑगस्टला केला होता प्रेमविवाह
तनु कुमारीने रडत रडत आपली कैफियत मांडली. तिने सांगितले की, "आम्ही १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रेमविवाह केला होता. पण माझ्या घरच्यांना हे लग्न मान्य नव्हते. लग्नानंतर सतत माझ्या पतीला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. रविवारी रात्री माझे वडील, भाऊ आणि मामा शस्त्रांसह घरात घुसले. मी माझ्या पतीच्या जिवाची भीक मागत होते, पण त्यांनी माझं काहीही ऐकलं नाही आणि माझ्या डोळ्यादेखत त्यांचा जीव घेतला."
१३ जणांवर गुन्हा दाखल
या भीषण हत्याकांडानंतर गावात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तनुच्या तक्रारीवरून तिचे वडील, मामा, भाऊ यांच्यासह एकूण १३ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून मुख्य आरोपी प्रेम कुमार भगत सध्या फरार आहे. मृत आयुष कुमारवर यापूर्वी काही गुन्हे दाखल असल्याची माहितीही समोर येत आहे, मात्र या हत्येचे मुख्य कारण प्रेमविवाहच असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.