आईचा निरोप घेतला अन् लेक थेट रेल्वेसमोर धावली! शेवटच्या चिठ्ठीमधील मजकूर वाचून चुकेल काळजाचा ठोका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 09:19 IST2026-01-06T09:18:54+5:302026-01-06T09:19:27+5:30
गुलनाजने आपल्या समस्यांबद्दल कधीच कोणाकडे वाच्यता केली नव्हती. ती अभ्यासात हुशार होती आणि भविष्याची स्वप्ने पाहत होती. मात्र....

आईचा निरोप घेतला अन् लेक थेट रेल्वेसमोर धावली! शेवटच्या चिठ्ठीमधील मजकूर वाचून चुकेल काळजाचा ठोका
l"अम्मी मी निघतेय, स्वतःची काळजी घे. मला उशीर होतोय, बस सुटेल..." हे शब्द उच्चारून घरामधून बाहेर पडलेली २६ वर्षांची गुलनाज पुन्हा घरी परतलीच नाही. उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये एका उच्चशिक्षित तरुणीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारून आपले जीवन संपवले. आत्महत्येपूर्वी तिने लिहिलेली सुसाईड नोट आता समोर आली असून, त्यातील भावूक मजकूर वाचून सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी आले.
परीक्षेचे निमित्त सांगून घर सोडले
नवाबगंज परिसरातील लल्ला मार्केटमध्ये राहणारी गुलनाज उर्फ नर्गिस ही बरेलीतील एका संस्थेत स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. सोमवारी सकाळी सातच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे परीक्षेला जातेय असे सांगून घरातून बाहेर पडली. आईचा निरोप घेताना तिने ज्या मायेने विचारपूस केली, ती शेवटची भेट ठरेल याची पुसटशी कल्पनाही तिच्या आईला नव्हती. घराबाहेर पडल्यानंतर काही वेळातच बिजोरिया रेल्वे स्टेशनजवळ तिने वेगाने येणाऱ्या ट्रेनसमोर झेप घेतली.
सुसाईड नोटमध्ये काय लिहिलंय?
पोलिसांना गुलनाजच्या पर्समध्ये एक सुसाईड नोट सापडली आहे. त्यात तिने लिहिले होते, "मी बँकेतून काढलेले १० हजार रुपये आणि माझ्या कानातले झुमके कपाटात ठेवले आहेत. आता माझ्या कोणत्याही बँक खात्यात पैसे उरलेले नाहीत. मी माझ्या आयुष्याला कंटाळले असून स्वमर्जीने हे पाऊल उचलत आहे. माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये किंवा कोणाला त्रास देऊ नये."
कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
गुलनाजने आपल्या समस्यांबद्दल कधीच कोणाकडे वाच्यता केली नव्हती. ती अभ्यासात हुशार होती आणि भविष्याची स्वप्ने पाहत होती. मात्र, अचानक तिने उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे तिचे कुटुंब पूर्णपणे कोलमडले आहे. 'आमच्या हसत्याखेळत्या मुलीने असं का केलं?' असा प्रश्न आता संपूर्ण परिसराला पडला आहे.
पोलिस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच नवाबगंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचे दिसून येत आहे. रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. सुसाईड नोटमधील हस्ताक्षराची पडताळणी केली जात असून, आत्महत्येमागचे नेमके कारण शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.