गळा दाबला, कानाखाली मारली, फरफटत नेलं...; मुलाला फुटबॉल लागताच शिक्षिका संतापली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 13:31 IST2025-11-20T13:29:33+5:302025-11-20T13:31:54+5:30
प्राथमिक शाळेत सातवीच्या विद्यार्थ्याला झालेल्या मारहाणीमुळे संताप व्यक्त केला जात आहे.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधील रामपूर मनिहारन भागातील चुनहेटी गावातील प्राथमिक शाळेत सातवीच्या विद्यार्थ्याला झालेल्या मारहाणीमुळे संताप व्यक्त केला जात आहे. मधल्या सुट्टीत मुलं खेळत असताना एका शिक्षिकेच्या मुलाला फुटबॉल लागला, ज्यामुळे संतप्त शिक्षिकेने फुटबॉल फेकणाऱ्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. जखमी विद्यार्थ्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण स्थानिक पोलीस आणि शिक्षण विभागापर्यंत पोहोचलं आहे. शिक्षिकेने मुलाचा गळा दाबला, कानाखाली मारली आणि फरफटत नेलं, ज्यामुळे मुलगा बेशुद्ध पडला असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
कुटुंबाने मुलाच्या चेहऱ्यावर आणि मानेवरच्या खुणा दाखवत पोलीस कारवाईची मागणी केली आहे. या घटनेमुळे ग्रामस्थही संतापले आहेत. सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची मनमानी वाढत आहे आणि लहान मुलांविरुद्ध हिंसक वर्तन सामान्य झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. सुरक्षित वातावरणाच्या आशेने मुलांना शाळेत पाठवतो पण शिक्षक असं वागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मुलाच्या कुटुंबाने शिक्षिकेला तात्काळ निलंबित करण्याची आणि कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
जिल्हा मूलभूत शिक्षण अधिकारी कोमल कुमारी यांनी घटनेची पुष्टी केली आहे, त्यांनी सांगितलं की, त्यांना व्हायरल व्हिडीओ आणि पालकांच्या तक्रारींबद्दल माहिती देण्यात आली आहे. हे प्रकरण बालियाखेरी ब्लॉकमधील चुनहेती गाडा उच्च प्राथमिक शाळेशी संबंधित आहे, जिथे एका शिक्षिकेवर मुलाला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.
तपास ब्लॉक शिक्षण अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे आणि जर आरोप सिद्ध झाले तर शिक्षिकेवर कठोर कारवाई केली जाईल. प्रशासकीय आढावा घेतल्यानंतर हे प्रकरण आता सरकारी शाळांमधील मुलांच्या सुरक्षिततेबद्दल आणि शिक्षकांच्या जबाबदारीबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित करतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी तपास ब्लॉक शिक्षण अधिकाऱ्यांकडे सोपवला आहे आणि जर आरोपांची पुष्टी झाली तर ते संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करतील.