Sadhvi Prem Baisa : डाळ अन् इंजेक्शन... साध्वी प्रेम बाईसा मृत्यू प्रकरणी वडील संशयाच्या भोवऱ्यात; त्या रात्री काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 13:14 IST2026-02-03T13:13:06+5:302026-02-03T13:14:45+5:30
Sadhvi Prem Baisa : राजस्थानमधील जोधपूर येथील साध्वी प्रेम बाईसा यांच्या संशयास्पद मृत्यूने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

Sadhvi Prem Baisa : डाळ अन् इंजेक्शन... साध्वी प्रेम बाईसा मृत्यू प्रकरणी वडील संशयाच्या भोवऱ्यात; त्या रात्री काय घडलं?
राजस्थानमधील जोधपूर येथील साध्वी प्रेम बाईसा यांच्या संशयास्पद मृत्यूने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणात तीन महत्त्वाचे संशयित तपासाच्या फेऱ्यात आहेत, ते म्हणजे वडील वीरमनाथ, कंपाउंडर देवी सिंह आणि सेवादार सुरेश. त्या रात्री नक्की काय घडले होते, याचा शोध घेण्याचा पोलीस सध्या प्रयत्न करत आहेत. पहिले संशयित वडील वीरमनाथ आहेत, जे शेवटच्या क्षणापर्यंत साध्वींसोबत होते. दुसरे संशयित कंपाउंडर देवी सिंह आहेत, ज्यांनी इंजेक्शन दिले होते. तर तिसरे संशयित सेवादार सुरेश आहेत, जे सहसा साध्वींना जेवण द्यायचे.
तपासादरम्यान साध्वींकडील दोन आयफोन आणि एक सॅमसंग मोबाईल जप्त करण्यात आला आहे. या मोबाईलमध्ये मृत्यूशी संबंधित महत्त्वाची माहिती असू शकते असा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र वडिलांना या फोनचे पासवर्ड विचारले असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. यामुळेच तपास यंत्रणांचा संशय अधिक बळावला आहे.
जेवणातील डाळ आणि इंजेक्शनवर प्रश्नचिन्ह
ज्या रात्री मृत्यू झाला, त्या रात्री साध्वींना सर्दी झाली होती आणि त्यांच्यासाठी डाळ बनवण्यात आली होती. सहसा सेवादार सुरेश जेवण घेऊन जात असे, मात्र त्या रात्री वडील वीरमनाथ स्वतः डाळ घेऊन खोलीत गेले होते. डाळ खाल्ल्यानंतर काही वेळातच साध्वींची प्रकृती बिघडू लागली आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर कंपाउंडरला बोलावून इंजेक्शन देण्यात आलं.
इंजेक्शननंतर शरीराचा रंग निळा पडला
इंजेक्शन दिल्यानंतर काही वेळातच साध्वींचा मृत्यू झाला. साध्वींच्या भावाच्या म्हणण्यानुसार, इंजेक्शननंतर शरीराचा रंग निळा पडला होता. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, कंपाउंडर देवी सिंहने असा दावा केला आहे की त्याने डॉक्टरांच्या चिठ्ठीनुसारच इंजेक्शन दिलं होतं. मात्र ते इंजेक्शन योग्य होतं का आणि त्यामुळेच मृत्यू झाला का, याचा पोलीस कसून तपास करत आहेत.