हरियाणाच्या रोहतक शहरातील सेक्टर-१ मध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पॅकेजिंग मटेरियल फॅक्ट्रीचे मालक संजय गुप्ता यांच्या घरी त्यांच्या मोलकरणीने तिच्या तीन साथीदारांसह कुटुंबातील सदस्यांना ओलीस ठेवून तब्बल ४५ लाख लुटले.
संजय गुप्ता सोमवारी फॅक्ट्रीमध्ये काम करत होते. संध्याकाळी कुटुंबासह चित्रपट पाहण्याचा बेत होता, म्हणून ते ४ वाजता घरी परतले. घरी पोहोचल्यावर त्यांनी पाहिले की त्यांची आई कुसुमलता आणि पत्नी संगीता दोघींनाही ओलीस ठेवण्यात आलं आहे. आईला खुर्चीला बांधण्यात आलं आहे आणि पत्नीचे हातपायही दोरीने बांधलेले आहेत.
संगीताने पोलिसांना दिलेल्या माहितीत सांगितलं की, घरात काम करणारी मोलकरीण रीमा, जी नेपाळची रहिवासी आहे. तिने तिच्या तीन साथीदारांना हा गुन्हा करण्यासाठी घरी बोलावलं. एक महिन्यापूर्वीच तिला कामावर ठेवण्यात आलं होतं, रीमाने संधी साधून दरवाजा उघडला आणि तीन गुन्हेगारांना आत जाऊ दिलं, तर इतर दोन आरोपी बाहेर रस्त्यावर पहारा देत होते.
आत प्रवेश करताच, गुन्हेगारांनी आई आणि संगीतावर हल्ला केला. त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आणि स्क्रूड्रायव्हर दाखवून धमकावलं. त्यांनी कपाटाच्या चाव्या मागितल्या. विरोध केल्याने जास्त मारहाण केली. ३५ लाख किमतीचे दागिने आणि १० लाख रोख रक्कम घेऊन गेले. या संपूर्ण घटनेदरम्यान, कुटुंबाला दीड तास ओलीस ठेवण्यात आलं. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.
माहिती मिळताच, पोलीस पथक घटनास्थळी पोहोचलं आणि बोटांचे ठसे, सीसीटीव्ही फुटेजसह सर्व पुरावे गोळा केले. पोलिसांनी सांगितलं की, घटनेनंतर मोलकरीण रीमा आणि तिचे साथीदार फरार आहेत. त्यांच्या संभाव्य लपण्याच्या ठिकाणांवर छापे टाकले जात आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण आहे.