डोंबिवली सामूहिक बलात्कारातील आरोपी राजकारण्यांचे नातेवाईक! सेना,मनसे,राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची पोलीस स्टेशनवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 07:00 AM2021-09-24T07:00:05+5:302021-09-24T07:02:50+5:30

आरोपींनी अटक झाल्याची माहिती मिळताच शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे काही कार्यकर्ते आणि राजकीय पुढाऱ्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यास भेट देऊन या दबावतंत्राची चुणूक दाखवली. भाजपच्या नगरसेविकेने तर पोलीस ठाण्यात फोन करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

Relatives of politicians accused in Dombivli gang-rape! shiv Sena, MNS, NCP activist in Police station | डोंबिवली सामूहिक बलात्कारातील आरोपी राजकारण्यांचे नातेवाईक! सेना,मनसे,राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची पोलीस स्टेशनवारी

डोंबिवली सामूहिक बलात्कारातील आरोपी राजकारण्यांचे नातेवाईक! सेना,मनसे,राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची पोलीस स्टेशनवारी

Next

डोंबिवली (ठाणे) : अल्पवयीन मुलीवर तब्बल ३३ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची अमानूष घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. बहुतांश आरोपींचे पालक हे राजकीय पक्षांचे पदाधिकारी असल्याने पोलिसांवरची जबाबदारी वाढली आहे. 

आरोपींनी अटक झाल्याची माहिती मिळताच शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे काही कार्यकर्ते आणि राजकीय पुढाऱ्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यास भेट देऊन या दबावतंत्राची चुणूक दाखवली. भाजपच्या नगरसेविकेने तर पोलीस ठाण्यात फोन करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

गुन्हेगारांचे स्थानिक राजकीय नेत्यांशी हितसंबंध असल्याने राजकीय हस्तक्षेप होण्याची भीती आहे. शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात येऊन पोलीस अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, तर काही मीडियाची गर्दी पाहून आल्या पावली माघारी फिरले. एका राजकीय पदाधिकाऱ्याने चेहऱ्यावर मास्क लावून आपला चेहरा दिसणार नाही, याची काळजी घेतली होती. 

डोंबिवली हादरली -
अजून काय घडणे अपेक्षित 
-  मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनीही घटनेबाबत संताप व्यक्त केला. बलात्काराची घटना अंगावर काटा आणणारी आहे. दिल्ली, उत्तर प्रदेशपेक्षा महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी नाही. हे सिद्ध होण्यासाठी मुख्यमंत्र्यांना अजून काय घडणे अपेक्षित आहे, असा सवाल शर्मिला ठाकरे यांनी ट्विट करुन केला.
-  डोंबिवली येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेने राज्यातील महिला सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दाखवून दिले आहे. राज्यातील उद्धव ठाकरे सरकारने आता तरी आपले डोळे उघडावेत, अशी टीका मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी केली.
-  महाराष्ट्रातील गुन्हेगारी वाढली आहे. कुठेतरी ही प्रकरणे दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे  डोंबिवलीतील बलात्काराच्या घटनेतील उर्वरित आरोपींना अटक करावी तसेच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी केली.

आमच्या मुलांना नाहक गोवले -
-  आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्यांच्या पालकांनी व नातेवाईकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात एकच गर्दी केली होती. आमची मुले निष्पाप असून त्यांना या प्रकरणात नाहक गोवले जात असल्याचा आरोप आरोपींच्या पालकांनी केला. 
-  पीडित मुलीने ओळखत नसल्याचे सांगूनही मुलांना पोलिसांनी आरोपी केल्याचा दावा काही पालकांनी केला. मुले लहान असून त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. त्यांची आयुष्य उद्ध्वस्त करू नका, असेही ते म्हणाले. 
-  माझा मुलगा आजारी असतानाही त्याला घरातून झोपेतून उठवून पोलिसांनी नेले, असे एका पालकाने सांगितले. जानेवारीपासून अत्याचार सुरू होते मग तेव्हाच पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार का केली नाही, असा सवाल त्यांनी केला.  

डोंबिवलीत घडलेल्या घटनेतील मुलगी अल्पवयीन आहे. ऑनलाइन असण्याच्या नादात दिशाभूल होऊन तिला त्या मुलांनी घेरलेले आहे. ती मुलगी फशी पडलेली आहे. याचा साक्षीदार संरक्षण कायद्यानुसार चोख तपास व्हावा. मुलीला संरक्षण देण्याबरोबरच तिच्या पुनर्वसनाची व्यवस्था करावी. याचे राजकारण करू नये. 
- डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधानपरिषद

पीडित तरुणी आणि आरोपींचा व्हॉट्सॲप ग्रुप पीडित तरुणी आणि आरोपींचा सहभाग असलेल्या व्हॉट्सॲप ग्रुपची तपासणी पोलीस करीत असून त्याआधारे काहींची धरपकड केल्याची व उर्वरित आरोपींना अटक केली जाणार आहे. व्हॉट्सॲप ग्रुप खेरीज अन्य कुणी गुंतले आहेत का, याचाही तपास सुरू आहे.

डोंबिवलीतील अत्याचाराच्या घटनेमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ही घटना संतापजनक असून, सरकारने तपासासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात एखादी घटना घडली की, अन्य राज्यांकडे बोट दाखविणे ही असंवेदनशीलता आहे. राज्यपालांच्या पत्रांना उत्तरे देण्यात श्रम घालविण्यापेक्षा महिलांवरील  अत्याचार कसे थांबविता येतील, यावर श्रम घालविले, तर ते अधिक हिताचे ठरेल.
- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा.

 घटनाक्रम -
-  २९ जानेवारी २०२१ ला पीडित मुलीशी शारीरिक संबंध ठेवल्याचा व्हिडीओ तिच्या प्रियकरानेच तयार केला. हा व्हिडीओ त्याने मित्राला दाखविला.
-  प्रियकराच्या मित्रानेही व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
-  त्यानंतर वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्यावर अन्य मित्रांनी डोंबिवलीत बलात्कार केला.
-  त्याचबरोबर बदलापूर, मुरबाड, रबाळे येथेही पीडित मुलीला नेऊन तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला.
-  बुधवार, २२ सप्टेंबर २०२१ पर्यंत पीडितेवर अत्याचार सुरूच होते. अखेर रात्री एका जवळच्या नातेवाईकासह तिने मानपाडा पोलीस ठाणे गाठत याप्रकरणी तक्रार दाखल केली.
-  आरोपींना गुरुवार, २३ सप्टेंबर २०२१ पर्यंत दुपारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने २९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
 

 

Read in English

Web Title: Relatives of politicians accused in Dombivli gang-rape! shiv Sena, MNS, NCP activist in Police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app