Odisha Crime: ओडिशाच्या गंजम जिल्ह्यात एका रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या हत्येचे कारण उघड झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. आर्थिक वाद आणि संशयातून पुतणीने आपल्या प्रियकराच्या आणि भावाच्या मदतीने स्वतःच्या काकाचे अपहरण करून त्यांची हत्या केली. सुधीर पात्रा असे या दुर्दैवी व्यावसायिकाचे नाव असून, या प्रकरणात आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.
व्हॉलीबॉल सामना पाहून परतताना अपहरण
ही घटना १५ एप्रिलच्या संध्याकाळी सुरू झाली. सुधीर पात्रा हे ब्रह्मपूर शहराच्या सीमेवर असलेला एक व्हॉलीबॉल सामना पाहून घरी परतत होते. मात्र, वाटेतच काही गुंडांनी त्यांचे अपहरण केले. सुधीर वेळेवर घरी न परतल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. या घटनेच्या आठवड्यानंतर, सोराडा येथील घनदाट जंगलात सुधीर यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. मृतदेहाची अवस्था इतकी भीषण होती की, केवळ अंगावरील कपड्यांवरून त्यांची ओळख पटवावी लागली.
संपत्तीचा वाद आणि 'करणी'चा संशय
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्येमागे निवेदिता पात्रा (सुधीर यांची पुतणी), तुषार पात्रा (पुतण्या) आणि निवेदिताचा प्रियकर कालु प्रधान हे मास्टरमाइंड आहेत. निवेदिताच्या वडिलांच्या निधनानंतर कुटुंबात वारसाहक्क आणि मालमत्तेच्या वाटणीवरून मोठे वाद सुरू होते. निवेदिता आणि तुषारला वाटत होते की, सुधीर पात्रा यांनी त्यांची मालमत्ता हडप केली. तसेच, निवेदिताला संशय होता की सुधीर यांनी करणी केल्याने तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. याच रागातून तिने काकांचा काटा काढण्याचे ठरवले.
रात्रभर पार्टी आणि नंतर लोखंडी रॉडने वार
१५ एप्रिल रोजी अपहरणकर्त्यांनी सुधीर यांना एका गाडीत जबरदस्तीने बसवले. प्रवासात गाडी खराब झाल्याने त्यांना दुसऱ्या गाडीत हलवून बालीगुडा येथील एका मंदिराच्या जवळ असलेल्या निर्जन ठिकाणी नेण्यात आले. धक्कादायक म्हणजे, सुधीर यांना डांबून ठेवल्यानंतर आरोपींनी तिथे रात्रभर मद्यधुंद पार्टी केली. त्यानंतर लोखंडी रॉड आणि लाठ्यांनी सुधीर यांना बेदम मारहाण केली. मारहाण सुरू असतानाच आरोपींनी सुधीर यांच्या घरच्यांना खंडणीसाठी फोनही केले होते. १६ एप्रिलच्या पहाटे सुधीर यांचा मृत्यू झाला आणि आरोपींनी त्यांचा मृतदेह बालीगुडा-कोरापुट रस्त्यावर फेकून दिला.
नऊ जणांना अटक
या कटात ओडिशाबाहेरील भाडोत्री गुंडांचाही समावेश होता. गुन्हा केल्यानंतर आरोपी छत्तीसगड आणि गुजरातच्या दिशेने पळाले होते. मात्र, तांत्रिक तपास आणि स्थानिक खबऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी सर्वांना शोधून काढलं. पोलिसांनी आतापर्यंत निवेदिता, तुषार आणि कालु प्रधान यांच्यासह नऊ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, या गुन्ह्यात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Web Summary : In Odisha, a niece orchestrated her uncle's murder due to property disputes and suspicion of witchcraft. She, along with her lover and brother, kidnapped and killed him. The body was found in a forest. Nine people have been arrested in connection with the crime.
Web Summary : ओडिशा में, संपत्ति विवाद और जादू टोना के शक में एक भतीजी ने अपने चाचा की हत्या की साजिश रची। उसने अपने प्रेमी और भाई के साथ मिलकर उनका अपहरण कर हत्या कर दी। शव जंगल में मिला। इस मामले में नौ लोगों को गिरफ्तार किया गया है।