गावाहून मदतीला बोलावलेल्या तरुणीवर अत्याचार; व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2021 23:17 IST2021-01-05T23:16:46+5:302021-01-05T23:17:29+5:30
लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वेळोवेळी ठेवले शारीरिक संबंध..

गावाहून मदतीला बोलावलेल्या तरुणीवर अत्याचार; व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी
पुणे : हाताचे ऑपरेशन असल्याचे सांगून गावाहून मदतीला बोलावलेल्या तरुणीवर अत्याचार करून त्याचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी रोहन सुरेंद्रनाथ आवळे (रा. सांगली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी सांगली येथील एका २२ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. हे दोघेही ओळखीचे आहेत. रोहन याने आपल्या हाताचे ऑपरेशन असल्याचे सांगून या तरुणीला मदतीसाठी एप्रिल २०१८ मध्ये पुण्यात बोलावले होते. तिला मित्राच्या रुमवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्याचा व्हिडिओ काढून हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वेळोवेळी शारीरीक संबंध ठेवले. तिच्याकडून जबरदस्तीने १५ हजार रुपये घेतले. त्याने ही गोष्ट पोलिसांना सांगितली तर घराच्यांना जिवे मारेल व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. या त्रासाला कंटाळून तिने सांगली पोलिसांकडे फिर्याद दिली होती. सांगली पोलिसांनी हा गुन्हा पुण्यात वर्ग केला आहे.