डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 17:47 IST2025-08-22T17:44:25+5:302025-08-22T17:47:55+5:30

उत्पादन शुल्क गुप्तचर पथकाने धाड टाकून एका मोठ्या ड्रग्ज निर्मिती फॅक्टरीचा पर्दाफाश केला. ही फॅक्टरी दाऊद गँगशी संबंधित असल्याचा दावा अधिकाऱ्यानी केला. 

Raid on D-Gang's 'drug factory', MD drugs worth Rs 92 crore seized, Mumbai-Thane connection also | डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन

डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन

रहिवाशी भागातील एका इमारतीतच ड्रग्जची निर्मिती सुरू होती. उत्पादन शुल्कच्या गुप्तचर विभागाला याची माहिती मिळाली. अधिकाऱ्यांनी धाड टाकली तेव्हा आतील दृश्य बघून ते अचंबित झाले. या फॅक्टरीमध्ये तब्बल ६१.२० किलो एमडी अर्थात द्रवरुपात मेफेड्रोन मिळाले. पोलिसांनी ९२ कोटींचे हे ड्रग्ज जप्त केले आहे. हे ड्रग्ज देशभरात पाठवले जाणार होते. या प्रकरणात मुंबई-ठाण्याचेही कनेक्शन समोर आले आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

ही ड्रग्ज फॅक्टरी भोपाळमधील जगदीशपुरा भागात सुरू होती. दाऊद गँगशी संबंधित लोकांकडूनच ही ड्रग्ज फॅक्टरी सुरू होती. या धाडीनंतर डी-गँगच्या ड्रग्ज रॅकेटचे जाळे मध्य प्रदेशपर्यंत पोहोचले असल्याचे समोर आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

ड्रग्ज फॅक्टरी चालवणारे आरोपी कोण?

ड्रग्ज फॅक्टरीमध्ये औद्योगिक कंपनीत वापरले जाणारी मिक्सिंग मशीन्स होत्या. त्याचबरोबर तापमान नियंत्रित करणारे रिअक्टर आणि इतर सगळी व्यवस्था केली गेलेली होती. या ड्रग्ज फॅक्टरीची जबाबदारी अशोकनगरच्या फैसल कुरेशी यांच्यावर होती. त्याने डिप्लोमा शिक्षण घेतलेले असून, गुजरातमधून फार्मासिस्ट म्हणून प्रशिक्षण घेतलेलं आहे. 

फैसलसोबत विदिशाचा रज्जाक खानही आहे. त्याने ड्रग्ज फॅक्टरीसाठी सुरक्षित ठिकाण शोधले, त्याचबरोबर त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची व्यवस्था केली. दोघांवरही ही जबाबदारी होती की, एका सुरक्षित ठिकाणी फॅक्टरी सुरू करावी आणि एमडी ड्रग्जची निर्मिती करावी. 

मुंबई-ठाण्याचे कनेक्शन काय?

तपासातून अशी माहिती समोर आली आहे की, ड्रग्ज निर्मितीसाठी लागणारी रसायने मिथिलीन डायक्लोराईड, एसीटोन, मोनोमेथिलएमीन, हायडोक्लोरिक अॅसिड आणि २ ब्रोमो हे सगळे आरोपी मुंबई, भिवंडी आणि ठाण्यातून आणत होते. 

आरोपींनी सांगितले की, ४०० किलो माल आधीच मुंबईवरून भोपाळला पोहचला होता. हे सगळे सलीम डोलाच्या सांगण्यावरून झाले. या कामासाठी अझरुद्दीन इदरीसी नावाच्या व्यक्तीला पैसे देऊन वापरण्यात आले. 

या कारखान्यात तयार केला जाणारे ड्रग्ज मध्य प्रदेशातच नाही, तर देशातील अनेक भागात पाठवण्याची आरोपींची योजना होती. या प्रकरणात सूरत आणि मुंबईतून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातून याचे देशभर नेटवर्क असल्याचेही उघड झाले आहे. 

Web Title: Raid on D-Gang's 'drug factory', MD drugs worth Rs 92 crore seized, Mumbai-Thane connection also

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.