पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने उचललं टोकाचं पाऊल; ५४ मिनिटांचा बनवला Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 11:56 IST2025-01-01T11:55:54+5:302025-01-01T11:56:10+5:30
पुनीत खुराना असं व्यक्तीचं नाव आहे.

पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने उचललं टोकाचं पाऊल; ५४ मिनिटांचा बनवला Video
दिल्लीतील मॉडेल टाऊनमध्ये बंगळुरूच्या अतुल सुभाषच्या आत्महत्येसारखंच प्रकरण समोर आलं आहे. ५४ मिनिटांचा व्हिडीओ रेकॉर्ड केल्यानंतर आत्महत्या केली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास करत आहेत. पुनीत खुराना असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. पत्नी मनिका पाहवा हिच्यामुळे तो त्रस्त असल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे. या कपलने आधीच घटस्फोटासाठी अर्ज केला होता.
डिसेंबरमध्येच अतुल सुभाषच्या प्रकरणाने लोकांना मोठा धक्का दिला होता. बंगळुरूमध्ये एआय इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या अतुल सुभाषने आत्महत्या करण्यापूर्वी सुमारे दीड तासाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये त्याने सासरच्या मंडळींवर मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता. अतुलने २४ पानी सुसाईड नोटही टाकली होती.
अतुल सुभाष यांनी ९ डिसेंबर रोजी आत्महत्या केली. त्यानंतर त्याच्या पालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांची पत्नी निकिता सिंघानिया, तिची आई आणि भावाला पोलिसांनी १३ डिसेंबरला अटक केली होती. निकिता सिंघानिया जेलमध्ये आहेत. जामिनावर पुढील सुनावणी ४ जानेवारीला होणार आहे. निकिताला बंगळुरू पोलिसांनी गुरुग्राममधून आणि आई, भावाला प्रयागराजमधून अटक केली होती.
बंगळुरू पोलिसांनी या प्रकरणी निकिता सिंघानिया, आई निशा सिंघानिया, भाऊ अनुराग सिंघानिया आणि काका सुशील सिंघानिया यांना आरोपी केलं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी अतुलने १ तास २३ मिनिटांचा व्हिडीओ आणि २४ पानांची सुसाईड नोट जारी केली होती, ज्यात पत्नी आणि तिच्या कुटुंबियांवर मानसिक छळ होत असल्याचा आरोप केला होता. त्यांनी पत्नी निकिता सिंघानियावर हे प्रकरण मिटवण्यासाठी ३ कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला होता. अतुलने निकितावर अनेक खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही केला होता.