Pune Porsche Accident Case: अल्पवयीन आरोपीच्या वडिलांसह ८ जणांचा जामीन अर्ज फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 10:34 IST2025-12-17T10:24:46+5:302025-12-17T10:34:28+5:30
Pune Porsche Accident Case: पुण्यातील पोर्शे कारच्या हिट अँड-रन प्रकरणात दोन जणांच्या मृत्यूप्रकरणी आरोपी असलेल्या आठ जणांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळला.

Pune Porsche Accident Case: अल्पवयीन आरोपीच्या वडिलांसह ८ जणांचा जामीन अर्ज फेटाळला
Pune Porsche Crash Case: पुण्यातील पोर्शे कारच्या हिट अँड-रन प्रकरणात दोन जणांच्या मृत्यूप्रकरणी आरोपी असलेल्या आठ जणांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळला. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह आठ आरोपींची जामिनावर सुटका करण्यास न्यायालयाने नकार दिला.
अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल, आशिष मित्तल, आदित्य सूद, अरुणकुमार सिंग, अशपाक मकंदर, अमर गायकवाड, डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हलनोर यांचे जामीन अर्ज फेटाळले आहेत. राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी जामीन अर्जावर आक्षेप घेतला.
आरोपीनी या प्रकरणातील अत्यंत महत्त्वाचा पुरावा म्हणजे अल्पवयीन आरोपीचे रक्तनमुने बदलण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणातील साक्षीदार हे वैद्यकीय विद्यार्थी, गरीब व्यक्ती असल्याने आरोपी सहजपणे त्यांना धमकावू शकतात. त्यांच्यावर दबाव आणला जाऊ शकतो, असा युक्तिवाद हिरे यांनी न्यायालयात केला.
आरोप काय?
अशपाक मकंदर याने विशाल अग्रवाल यांची ओळख डॉ. तावरे आणि डॉ. हलनोर यांच्याशी करून दिली होती, जेणेकरून रक्तनमुने अदलाबदल करता येतील, तर अमर गायकवाडने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
आशिष मित्तल आणि आदित्य सूद यांच्यावर दोन्ही अल्पवयीन आरोर्पीच्या रक्तनमुन्यांच्या जागी स्वतःचे रक्तनमुने देण्याचा आरोप आहे, तर अरुणकुमार सिंग याने सूद आणि मित्तल यांना रक्तनमुने देण्यास सांगितले होते, असा आरोप सरकारी वकिलांनी केला आहे.