पुण्याच दाजीने दगडाने ठेचून मेव्हण्याची केली हत्या; १५ दिवसांपूर्वीच केली होती मारहाणीची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 10:55 IST2020-06-01T10:36:29+5:302020-06-01T10:55:25+5:30
याप्रकरणी दोन संशयितांना विश्रांतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पुण्याच दाजीने दगडाने ठेचून मेव्हण्याची केली हत्या; १५ दिवसांपूर्वीच केली होती मारहाणीची तक्रार
पुणे / येरवडा : पूर्ववैनस्यातून दाजीने मित्रांच्या मदतीने आपल्या बहिणीच्या भावाचा मेव्हण्याचा दगडाने ठेचून खुन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धानोरी येथील मोकळ्या मैदानात ही धक्कादायक घटना रविवारी मध्यरात्री दीड वाजता घडली.
अक्षय सुरेश गागोदेकर (वय २४, रा. गोकुळनगर, धानोरी) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. अक्षय याला वाचविण्यासाठी पुढे आलेला गणेश हा मित्रही या घटनेत जखमी झाला आहे. याप्रकरणी अक्षयची आई मथुरा गागोदेकर यांनी विश्रांतवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. इंद्रजित गायकवाड, आकाश व आणखी दोन साथीदारांविरुद्ध विश्रांतवाडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दोन संशयितांना विश्रांतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय याची बहिण श्रुतिका ही गेल्या ३ वर्षांपासून इंद्रजितबरोबर पतीपत्नी प्रमाणे राहतात. लग्न न करता राहण्याचा अक्षयचा विरोध होता. त्यावरुन त्यांच्या वादावादी होत असे. इंद्रजित आणि श्रुतिका यांच्यात भांडणे होत होती. तेव्हा इंद्रजित तिला मारहाण करीत असे. तेव्हा ती आपल्या माहेरी आईकडे तक्रार करीत असे. त्यातून अक्षयला इंद्रजितबद्दल राग होता. १५ दिवसांपूर्वी श्रुतिका अशीच तक्रार करुन घरी गेली होती. त्यावेळी अक्षय याने त्याला खल्लासच करतो, असे म्हणाला होता.
इंद्रजित व त्याच्या साथीदारांनी अक्षय याला गोकुळनगर येथील मोकळ्या मैदानात बोलावले होते. ते सर्व जण दारु पित बसले असताना त्यांच्या पुन्हा वाद झाला. एकमेकांना शिवीगाळ करीत ते मारायला उठले. त्यावेळी अक्षय याने आधीच आणलेले हत्यार बाहेर काढले. त्याने हल्ला करण्यापूर्वीच इंद्रजित व आकाश याने त्याच्या डोक्यात दगड घातला. तसेच त्याच्या दोन साथीदारांनी दांडक्याने व लाथाबुक्यांनी मारहाण करुन त्याचा निर्घुण खुन केला. यावेळी अक्षयला वाचविण्यासाठी धावलेल्या गणेश यालाही लाकडी दांडक्याने मारहाण करुन त्यांनी जखमी केले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, परिमंडळ एक च्या पोलीस उपायुक्त श्रीमती स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, मिलिंद पाटील, पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड, गुन्हे निरीक्षक रवींद्र कदम घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक रवींद्र कदम अधिक तपास करीत आहेत.
याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने ५ जणांना खडकीतील होळकर पुलाजवळील खिश्चन स्मशानभूमीत पकडले. इंद्रजीत गुलाब गायकवाड़ (वय २३ , रा. गोकुळ नगर,धानोरी), निलेश विश्वनाथ शिगवन (वय २४, रा. गोकुळ नगर, धानोरी, विजय कालूराम फंड( वय २५, रा. सर्व्हेट क्वाटर्स, खडकी), कुणाल बाळु चव्हाण (वय २२, रा. बोपखेल, विश्रांतवाडी) यांना अटक केली आहे़ अधिक तपासासाठी विश्रांतवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.