एकीला लग्नाचे वचन तर दुसरीबरोबर लग्नगाठ; बोहल्यावर चढण्यापूर्वीच ठोकल्या नवरदेवाला बेडया
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 21:31 IST2021-12-30T21:30:34+5:302021-12-30T21:31:21+5:30
Crime News : कल्याण पूर्वेतील शिवाजी कॉलनी येथे राहणारा अजय हा रेल्वेत नोकरीला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून त्याचे एका तरूणीसोबत प्रेमसंबंध सुरू होते.

एकीला लग्नाचे वचन तर दुसरीबरोबर लग्नगाठ; बोहल्यावर चढण्यापूर्वीच ठोकल्या नवरदेवाला बेडया
कल्याण - एका 29 वर्षीय तरूणीसोबत प्रेमसंबंध ठेवून तीला लग्नाचे वचन देणा-या आणि तीचा विश्वासघात करून दुसरीबरोबर लग्नगाठ बांधण्याच्या तयारीत असलेल्या नवरदेवाला बोहल्यावर चढण्यापूर्वीच कोळसेवाडी पोलिसांनी बेडया ठोकल्या. बुधवारी त्याचे लग्न होणार होते परंतू लग्नाला काही तासांचा अवधी असतानाच त्याला अमरावती येथून ताब्यात घेतले. अजय उर्फ विकी अॅन्थोनी फ्रान्सिस असे नवरदेवाचे नाव आहे.
कल्याण पूर्वेतील शिवाजी कॉलनी येथे राहणारा अजय हा रेल्वेत नोकरीला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून त्याचे एका तरूणीसोबत प्रेमसंबंध सुरू होते. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याबरोबर अनेकदा शारीरीक संबंध देखील ठेवले. यात ती गर्भवती राहील्याने तीचा गर्भपातही केला. तीने लग्नासाठी आग्रह केला असता अजयने नकार देऊन तीला शिवीगाळ आणि मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देखील दिली. दरम्यान अजयने तीला अंधारात ठेवून दुस-या मुलीबरोबर लग्न करण्याचा घाट घातला. बुधवारी त्याचे लग्न अमरावती येथील बडनेरामध्ये होणार होते. याची माहीती प्रेयसीला मिळताच तिने तत्काळ कोळसेवाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. तक्रारीनुसार पोलिसांनी तिच्यासह लग्नाच्या ठिकाणी धाव घेतली. लग्नाला काही तासांचा अवधी असताना बुधवारी पहाटे चार च्या सुमारास अजयला अटक केली. त्याला गुरूवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्याला 3 जानेवारीर्पयत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक इर्शाद सय्यद करीत आहेत.