आमदाराच्या अटकेसाठी पत्रकार परिषद घेणं भोवलं; भाजपा खा. रामदास तडस यांच्याविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 15:58 IST2021-05-12T15:55:39+5:302021-05-12T15:58:10+5:30
Filed a case against BJP MP Ramdas Tadas : वर्ध्यातील रामनगर पोलिसांत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आमदाराच्या अटकेसाठी पत्रकार परिषद घेणं भोवलं; भाजपा खा. रामदास तडस यांच्याविरोधात गुन्हा दाखल
वर्धा : वर्ध्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी आमदाररणजित कांबळे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी भाजपाचे खासदार रामदास तडस यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत कोरोना नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप असून, याप्रकरणी खासदार तडस यांच्यासह आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्ध्यातील रामनगर पोलिसांत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
देवळी-पुलगाव विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसआमदार रणजित कांबळे यांच्याविरुद्ध वर्धा शहर पोलीस ठाण्यात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची घटना ताजी असतानाच आ. रणजित कांबळे यांनी देवळीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण धमाणे यांनाही अश्लिल शिवीगाळ केल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी देवळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोना संकटाच्या काळात सेवा देणारे देवळीचे तालूका आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण धमाणे यांना देवळी-पुलगाव विधानसभा मतदार संघात कुठलीही परवानगी न घेता कोविड चाचणी शिबीर घेतल्याचे कारण पुढे करून अश्लिल शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी काँग्रेसचे आ. रणजित कांबळे यांच्याविरुद्ध देवळी पोलिसात तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोविड संकटाच्या काळातच कर्तव्य दक्ष आरोग्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी आ. रणजित कांबळे यांच्याविरुद्ध वर्धा शहर पोलीस ठाण्यानंतर देवळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तळात उलट-सुटल चर्चेला उधाण आहे आहे. देवळी येथील दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक तिरूपती राणे करीत आहेत.
कांबळेंना अटकेसाठी भाजप आक्रमक; तीव्र आंदोलनाचा दिला इशारा
आरोग्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून जीवानिशी ठार करण्याची धमकी देणाऱ्या काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांना तातडीने अटक करण्यात यावी. अन्यथा भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरत तीव्र आंदोलन करेल, असा इशारा भाजपचे खा. रामदास तडस यांनी आयोजित पत्रकर परिषदेतून दिला होता.