लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 17:13 IST2025-10-19T17:13:02+5:302025-10-19T17:13:53+5:30
एका गर्भवती महिलेची माजी लिव्ह-इन पार्टनरने भर रस्त्यात चाकूने वार करून हत्या केली. महिलेची हत्या केल्यानंतर आरोपीने तिच्या पतीवरही चाकूने हल्ला केला.

फोटो - ndtv.in
दिल्लीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका गर्भवती महिलेची तिच्या माजी लिव्ह-इन पार्टनरने भर रस्त्यात चाकूने वार करून हत्या केली. महिलेची हत्या केल्यानंतर आरोपीने तिच्या पतीवरही चाकूने हल्ला केला. याच दरम्यान पती आरोपीकडून चाकू हिसकावून घेण्यात यशस्वी झाला आणि त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात आरोपीचाही मृत्यू झाला. ही घटना दिल्लीतील नबी करीब परिसरात घडली. शालिनी आणि आशू अशी मृतांची नावं आहेत. पोलीस तपासात शालिनी दोन मुलांची आई असल्याचं समोर आलं आहे.
मध्य दिल्लीचे डीसीपी निधीन वलसन यांनी हत्येबाबत सांगितलं की, शनिवारी रात्री १०:१५ च्या सुमारास ही घटना घडली. आकाश आणि शालिनी कुतुब रोडवर शालिनीची आई शीला हिला भेटायला गेले होते. तिथे आशू अचानक आला आणि त्याने आकाशवर चाकूने हल्ला केला. आमची टीम सध्या या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहे. शालिनीचा पती आकाश देखील या घटनेत जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा तिघांमध्ये वाद झाला. वाद इतका वाढला की आशूने संतापून चाकू बाहेर काढला आणि शालिनीवर हल्ला केला. शालिनी जमिनीवर पडली. त्यानंतर आशूने आकाशवरही हल्ला केला. जखमी आकाशने चाकू हिसकावून घेतला आणि स्वसंरक्षणार्थ प्रत्युत्तर दिलं, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा तिघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी शालिनी आणि आशूला मृत घोषित केलं.
आकाश अजूनही गंभीर स्थितीत आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत. शालिनी आणि आकाशचं लग्न पाच वर्षांपूर्वी झालं होतं, शालिनीने आकाशवर बलात्काराचा आरोप केला होता, त्यानंतर त्यांना कलम ३७६ अंतर्गत लग्न करण्यास भाग पाडण्यात आलं. लग्नानंतर त्यांना दोन मुली झाल्या आणि आता शालिनीने पुन्हा गर्भवती असल्याची माहिती समोर आली आहे.