पेपरफुटीच्या तपासासाठी पोलिस पथके कराड, पुण्यात; प्रश्नपत्रिका पुरवणाऱ्या रितेशकुमारचा शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 09:42 IST2025-11-27T09:42:19+5:302025-11-27T09:42:43+5:30
टीईटी आणि सेटचे पेपर फोडून लाखो रुपयांची कमाई केलेल्या गायकवाड टोळीच्या गुन्ह्याची व्याप्ती वाढली आहे, २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

पेपरफुटीच्या तपासासाठी पोलिस पथके कराड, पुण्यात; प्रश्नपत्रिका पुरवणाऱ्या रितेशकुमारचा शोध सुरू
कोल्हापूर - टीईटी आणि सेट परीक्षेचे पेपर फोडल्याप्रकरणी अटकेत असलेल्या गायकवाड टोळीचा अधिक तपास आणि प्रश्नपत्रिका पुरवणारा रितेशकुमारच्या शोधासाठी पोलिसांची पथके कराड व पुण्यात पोहोचली आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षा प्रक्रियेची माहिती घेतली जाणार आहे. तसेच पेपरफुटीतील लाभार्थी शिक्षकांचा शोध सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी पोलिस उपअधीक्षक सुजित क्षीरसागर यांनी दिली.
टीईटी आणि सेटचे पेपर फोडून लाखो रुपयांची कमाई केलेल्या गायकवाड टोळीच्या गुन्ह्याची व्याप्ती वाढली आहे. त्यांना बिहारमधील रितेशकुमार या व्यक्तीने २०२३ पासून काही परीक्षांचे पेपर पुरवल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. अटकेतील संदीप आणि महेश गायकवाड या बंधूंची जय हनुमान करिअर अकॅडमी बेलवाडी (ता. कराड) येथे आहे. या अकॅडमीतून गेल्या चार वर्षांत विविध खात्यांमध्ये नियुक्त झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती घेतली जाणार आहे.
दोन कार, १९ मोबाइल जप्त
एजंट राहुल पाटील याच्याकडील फॉर्च्युनर कार आणि सूत्रधार महेश गायकवाड याची व्हेन्यू कार पोलिसांनी जप्त केली. तसेच १९ मोबाइल, दोन प्रिंटर, असा सुमारे २५ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
परीक्षा परिषदेकडून माहिती देण्यास टाळाटाळ
तपास अधिकारी क्षीरसागर यांनी परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना फोन करून परीक्षेच्या नियोजनाबद्दल माहिती मागितली. मात्र, गोपनीय माहिती देता येणार नसल्याचे सांगत त्यांनी सुरुवातीला सहकार्य करण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर नोटीस घेऊनच पोलिस अधिकारी परीक्षा परिषदेच्या पुण्यातील कार्यालयात पोहोचले.
१८४ नावांची यादी
टीईटीचा पेपर मिळविण्यासाठी १८४ परीक्षार्थ्यांनी १६ एजंटशी संपर्क साधला होता. या सर्वांची यादी पोलिसांकडे आहे. यातील किती जणांनी प्रत्यक्षात शैक्षणिक कागदपत्रे आणि धनादेश एजंटकडे दिले, याची पडताळणी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शिक्षण खात्याशी पोलिसांचा पत्रव्यवहार
अटकेतील शिक्षक रोहित सावंत, अभिजित पाटील आणि किरण बरकाळे यांच्या नियुक्तीची माहिती मागवण्यासाठी पोलिसांनी उच्च माध्यमिक शिक्षण विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. तसेच प्राचार्य गुरुनाथ चौगले याच्या चौकशीसाठी शिवाजी विद्यापीठ, शिक्षण सहसंचालक कार्यालय आणि सोळांकुर येथील शिक्षण संस्थेशी पत्रव्यवहार केला आहे.