प्रेमसंबंधास नकार देऊन गालावर मारली चापट; रागाच्या भरात आरोपीने केली विवाहितेची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 17:37 IST2025-06-29T17:37:53+5:302025-06-29T17:37:53+5:30
नाशिकमध्ये एकतर्फी प्रेमातून महिलेची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी २४ तासांमध्ये अटक केली

प्रेमसंबंधास नकार देऊन गालावर मारली चापट; रागाच्या भरात आरोपीने केली विवाहितेची हत्या
Nashik Crime: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरवळ येथील विवाहित महिलेची एकतर्फी प्रेमातून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर संशयित आरोपीला पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. प्रेमसंबंधास नकार दिल्यानंतर आरोपीला महिलेने कानाखाली मारली होती. त्याच रागाच्या भरात आरोपीने महिलेच्या डोक्यावर वार करुन तिला संपवले. या घटनेनंतर आरोपीने तिथू पळ काढला होता. पोलिसांनी केवळ वर्णनाच्या आधारेच आरोपीला अटक केली आहे.
खरवळ येथील वीरनगरमधील महिला वैशाली नामदेव चव्हाण (४०) सायंकाळी शेतावरून घरी परतत असताना रस्त्यावर पडून तिच्या डोक्याला जखम होऊन जखमी अवस्थेत मिळाली. तिला नातेवाइकांनी हरसूल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केली. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदर महिलेला मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर हरसूल पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व वैद्यकीय अधिकारी, तसेच महिलेचे पती नामदेव चव्हाण यांनी चर्चा केली. डोक्याच्या पाठीमागे झालेल्या जखमेवरून महिला ही रस्त्यावरून पडून जखमी झालेली नसून तिचा घातपात झाल्याचा अंदाज व्यक्त केला गेला. यावरून वैशालीचा अज्ञात इसमाने खून केल्याची खात्री पटली. यानंतर, पती नामदेव चव्हाण यांनी हरसूल पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक चेतन लोखंडे यांनी तपासाची चक्रे तातडीने फिरविली. गुप्त माहितीच्या आधारे संध्याकाळच्या सुमारास वीरनगर येथे घटनास्थळाच्या आजूबाजूला अज्ञात गुन्हेगाराचा शोध चालू केला. यावेळी महिलेच्या शेताजवळील एका शेतकऱ्याने वैशाली चालत जात असलेल्या रस्त्याच्या दिशेने एक उंच इसम धावत जाताना पाहिला होता असं सांगितले. वैशालीच्या घरी तसेच तिच्या पतीकडे पत्ता विचारण्यासाठी एक जण येऊन गेल्याची माहितीही पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्यांच्याकडून त्या अज्ञात इसमाचे वर्णन जाणून घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, काळा शर्ट त्यावर पांढरा पट्टा आणि निळसर रंगाची पॅण्ट घातलेल्या अनोळखी इसमाविरुद्ध हरसूल पोलिस ठाण्यामध्ये महिलेच्या पतीने फिर्याद दाखल केली. अंगावरच्या कपड्याच्या वर्णनावरून आरोपीचा शोध घेण्यास हरसूल पोलिसांनी सुरुवात केली. त्यावेळी वीरनगर भागात भगवान पांडुरंग शिंदे हा संशयित इसम फिरताना आढळल्याचे परिसरातील ग्रामस्थांनी सांगितली. याबाबत महिलेच्या पतीकडे खात्री केल्यानंतर हरसूल पोलिसांनी तपास पथक तयार करून मुसळधार पावसात भगवान पांडुरंग शिंदे यास ताब्यात घेतले.
आरोपी भगवान पांडुरंग शिंदे यापूर्वी या महिलेकडे प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी करण्यासाठी आला होता, पण त्यास नकार मिळाला. त्यानंतर, पुन्हा घटनेच्या दिवशीही आरोपीने मयत महिलेकडे प्रेमसंबंधाची मागणी केली. यावेळी या महिलेने आरोपीच्या गालात चापट लगावल्याने आरोपीला राग अनावर झाला. त्याने जवळ पडलेल्या लाकडी दांड्याने डोक्यात वार करत तिची हत्या केली. त्यानंतर आरोपीने तिथून पळ काढला.