फोन आला अन् पोलीस धावले; गुप्तधनाच्या हव्यासापोटी चिमुरड्याचा बळी देण्याचा डाव उधळला; घरातच खोदला होता खड्डा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 14:12 IST2026-01-05T14:03:29+5:302026-01-05T14:12:10+5:30
गुप्त धनासाठी चिमुकल्याचा बळी देण्याचा प्रकार बंगळुरुमध्ये उघडकीस आला.

फोन आला अन् पोलीस धावले; गुप्तधनाच्या हव्यासापोटी चिमुरड्याचा बळी देण्याचा डाव उधळला; घरातच खोदला होता खड्डा
Bengaluru Crime:विज्ञानाच्या युगातही अंधश्रद्धेचा भयानक चेहरा समोर आणणारी एक घटना कर्नाटकच्या बंगळुरू ग्रामीण जिल्ह्यातून समोर आली आहे. गुप्तधन मिळवण्याच्या हव्यासापोटी एका ८ महिन्यांच्या निष्पाप बाळाचा बळी देण्याचा प्रयत्न पोलिसांनी वेळीच धाड टाकून हाणून पाडला. एका अज्ञात फोन कॉलने या बाळाचे प्राण वाचवले असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
होसाकोटे तालुक्यातील सुलिबेले येथील जनता कॉलनीमध्ये ही धक्कादायक घटना घडली. सय्यद इमरान नावाच्या व्यक्तीच्या घरात ही नरबळीची विधी सुरू असल्याची माहिती बाल संरक्षण युनिटला एका अज्ञात व्यक्तीने फोनवरून दिली. रविवारी पौर्णिमा असल्याने रात्रीच्या वेळी हा बळी दिला जाणार होता. माहिती मिळताच पोलिसांनी आणि बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी तातडीने इमरानच्या घरावर छापा टाकला.
घरात खड्डा, पूजेची जय्यत तयारी
पोलीस जेव्हा घरात शिरले तेव्हा तेथील दृश्य पाहून त्यांनाही धक्का बसला. घराच्या एका खोलीत मोठा खड्डा खोदलेला होता. खड्ड्याभोवती पूजा-अर्चा करण्यासाठी लागणारे साहित्य, लिंबू, कुंकू आणि इतर विधींचे साहित्य विखुरलेले होते. ८ महिन्यांच्या बाळाचा बळी देऊन खजिन्याचा शोध घेण्याचा या दांपत्याचा कट होता, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
बाळाला मजुराकडून घेतले होते दत्तक
तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सय्यद इमरान आणि त्याच्या पत्नीने हे बाळ एका परप्रांतीय मजुराकडून सुमारे आठ महिन्यांपूर्वी घेतले होते. बाळ स्वतःचे आहे हे भासवण्यासाठी त्यांनी खोटे जन्म प्रमाणपत्रही बनवले होते. छापेमारी दरम्यान त्यांनी दत्तक घेतल्याचे एक संमतीपत्र दाखवून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न झाल्याने पोलिसांनी बाळाला त्यांच्या ताब्यातून मुक्त केले.
अज्ञात देवदूताचा तो फोन कॉल...
जर त्या अज्ञात व्यक्तीने वेळेवर हेल्पलाइनवर कॉल करून माहिती दिली नसती, तर पौर्णिमेच्या रात्री या निष्पाप जिवाचा अंत झाला असता. पोलिसांनी बाळाला सुखरूप वाचवून सध्या चाइल्ड केअर सेंटरमध्ये पाठवले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून सय्यद इमरान आणि संबंधित लोकांची चौकशी सुरू आहे. खजिन्यासाठी बळी देण्याचा हा प्रकार आहे की यामागे आणखी काही टोळी सक्रिय आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. खोटे जन्म प्रमाणपत्र बनवल्याप्रकरणीही त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.