मुलीवर अत्याचार: रोहा पोलिस ठाण्यासमोर जमावाचा संताप! अदिती तटकरे कुटुंबीयांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 10:56 IST2025-01-10T10:55:56+5:302025-01-10T10:56:44+5:30
आरोपीने ३० डिसेंबर रोजी शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता

मुलीवर अत्याचार: रोहा पोलिस ठाण्यासमोर जमावाचा संताप! अदिती तटकरे कुटुंबीयांच्या भेटीला
लोकमत न्यूज नेटवर्क, रोहा / अलिबाग: एका ११ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना रोहा तालुक्यात घडली आहे. त्याचे तीव्र पडसाद उमटले असून, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी बुधवारी रात्री तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने रोहा पोलिस ठाण्याजवळ जमा झाले होते. आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी जमावाने केली. मुख्य आरोपी आणि त्याला सहकार्य करणाऱ्या त्याच्या भावाला याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी पीडित कुटुंबाची गुरुवारी भेट घेतली. कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
आरोपीने ३० डिसेंबर रोजी शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. यावेळी त्याने याबाबत कुणालाही सांगितले तर तू आणि आई मरणार, असे धमकावले. घटनेनंतर मुलीने काही दिवसांनी हा प्रकार काकीला सांगितला. त्यानंतर तिच्या आई-वडिलांना ही माहिती समजली. याबाबत पीडित मुलीच्या आईसह नातेवाइकांनी आरोपीला जाब विचारला असता, त्याने तिच्या वडिलांसह काका-काकीला शिवीगाळ करून मारहाण केली.
पीडितेच्या आईने रोहा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो, मारहाण व शिवीगाळ करणे इत्यादी कलमांन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या घटनेची माहिती मिळताच जमावाने आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशा घोषणा दिल्या. आरोपी आणि त्याच्या भावाला १३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली .