'पप्पांनी मम्मीला जिवंत जाळले...'; ३५ लाखांच्या हुंड्यासाठी पत्नीची हत्या, मुलाने समोर आणलं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 10:43 IST2025-08-24T10:38:50+5:302025-08-24T10:43:32+5:30
उत्तर प्रदेशात विवाहितीचे सासरच्यांनी छळ करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

'पप्पांनी मम्मीला जिवंत जाळले...'; ३५ लाखांच्या हुंड्यासाठी पत्नीची हत्या, मुलाने समोर आणलं सत्य
Nikki Murder Case:उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे एका पतीने हुंड्यासाठी पत्नीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २८ वर्षीय निक्कीला तिच्या पतीने आणि सासरच्यांनी पेट्रोल ओतून जिवंत जाळले. ही घटना २१ ऑगस्टच्या रात्री घडली आणि रुग्णालयात नेत असताना निक्कीचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ निकीच्या बहिणीने तिच्या फोनवर रेकॉर्ड केला आहे, ज्यामध्ये तिच्या सासरचे निक्कीला मारहाण करताना दिसत आहेत.
नऊ वर्षांपूर्वी ग्रेटर नोएडाच्या घंगोला गावातील विपिन नावाच्या तरुणाशी निक्कीचा विवाह झाला होता.निक्कीची बहीण कांचन हिचेही लग्न विपिनच्या भावाशी झाले होते. लग्नापासून निक्की आणि तिच्या बहिणीचा हुंड्यासाठी छळ होत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. सासरच्यांनी ३५-३६ लाख रुपयांची मागणी केली होती. मागणी पूर्ण न झाल्याने निक्कीला सतत मारहाण करण्यात येत होती आणि शेवटी तिला जिवंत जाळण्यात आले. निक्कीला तिच्या घरात मारहाण करून जिवंत जाळल्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये तिच्यावर होणारी क्रूरता स्पष्टपणे दिसून येते. निक्कीच्या निष्पाप मुलाने पप्पांनी आईला लाईटरने जाळले, असं म्हणत या सगळ्या प्रकाराला वाचा फोडली.
निक्कीचे सासरचे लोक सतत ३५ लाख रुपयांची मागणी करत होते. लग्नात स्कॉर्पिओ गाडी आणि इतर अनेक गोष्टी देऊनही त्यांच्या मागण्या संपल्या नाहीत.
निक्कीच्या म्हणण्यानुसार, २१ ऑगस्ट रोजी निकीचा पती विपिन आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी तिला बेदम मारहाण केली. यानंतर निक्कीवर ज्वलनशील पदार्थ ओतून तिला पेटवून देण्यात आले. शेजाऱ्यांच्या मदतीने तिला आधी फोर्टिस रुग्णालयात त्यानंतर तेथून तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात रेफर करण्यात आले. मात्र वाटेतच निक्कीचा मृत्यू झाला.
यानंतर निक्कीच्या धाकट्या मुलाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आला, ज्यामध्ये तो स्पष्टपणे म्हणतो की,"पप्पांनी माझ्या आईच्या अंगावर काहीतरी ओतले, नंतर तिला कानाखाली मारली आणि नंतर लाईटरने तिला पेटवून दिले." हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी संताप व्यक्त केला. याप्रकरणी विपिनला अटक करण्यात आली.