"साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा"; ढसाढसा रडत पतीची पोलिसांत धाव, मागितला न्याय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 11:59 IST2025-04-02T11:59:04+5:302025-04-02T11:59:47+5:30
पत्नीच्या छळाला कंटाळलेल्या पतीने आता न्यायासाठी पोलिसांकडे दाद मागितली आहे.

"साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा"; ढसाढसा रडत पतीची पोलिसांत धाव, मागितला न्याय
मध्य प्रदेशातील पन्ना येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पत्नीने तिच्या पतीला बेदम मारहाण केली. पत्नीच्या छळाला कंटाळलेल्या पतीने आता न्यायासाठी पोलिसांकडे दाद मागितली आहे. "साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा" असं लोको पायलट असलेला पती म्हणाला. यासोबतच पतीने सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांना दिलं आहे, ज्यामध्ये त्याची पत्नी त्याला बेदम मारहाण करत आहे.
लोकेश कुमार मांझी हा सतना येथे लोको पायलट आहेत. लोकेशने त्यांच्या पत्नी आणि सासूवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. पत्नी त्याचा शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याची त्याने एसपी ऑफिसमध्ये तक्रार केली आहे. याशिवाय सोशल मीडियावर एक व्हिडिओही व्हायरल होत आहे ज्यामध्ये पत्नी तिच्या पतीला बेदम मारहाण करताना दिसत आहे.
पतीने मागितला न्याय
लोकेशने दिलेल्या माहितीनुसार, त्याचं लग्न जून २०२३ मध्ये हिंदू रितीरिवाजानुसार हर्षिता रॅकवारशी झालं होतं. लग्नानंतर लगेचच त्याची पत्नी, सासू आणि मेहुणा त्याच्याकडे पैसे आणि सोने-चांदीची मागणी करू लागले. तसं केलं नाही म्हणून त्यांनी मानसिक आणि शारीरिक छळ करायला सुरुवात केली. लोकेशने एका गरीब कुटुंबातील मुलीशी लग्न केलं होतं आणि हुंडा मागितला नव्हता. पण लग्नानंतर मुलीच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याला त्रास देण्यास सुरुवात केली.
पत्नीने केली मारहाण
लोकेशला २० मार्च रोजी मारहाण करण्यात आली, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली. या व्हिडिओमध्ये लोकेशची पत्नी त्याला जोरजोरात कानाखाली मारताना दिसत आहे, तर लोकेश हात जोडून तिला मारू नकोस अशी विनवणी करत आहे. या घटनेनंतर लोकेशने सतना कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आपल्या पत्नीच्या छळाला कंटाळून कॅमेरा बसवला होता जेणेकरून पत्नीबद्दलचे सत्य समोर येईल असं लोकेशने सांगितलं.
आत्महत्या करण्याची धमकी
लोकेशने तक्रार केल्याचं जेव्हा पत्नीला समजलं तेव्हापासून ती सतत आत्महत्या करण्याची धमकी देत होती. ती मुलीला जीवे मारण्याची धमकीही देते. या प्रकरणाबाबत एसपींनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करतील आणि तरुणाला मदत केली जाईल. सध्या या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे.